महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून(ईडी) अटक करण्यात आली आहे. सोमवार सकाळपासून भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना भारतीय दंडविधान १९/१ काळापैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. मंगळवारी सकाळी भुजबळ यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, भुजबळ यांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. ईडीच्या कार्यालयात दाखल होत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र 

छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय, महासंचालनालयाने पंकज भुजबळ यांना सलग दोन दिवस चौकशीसाठी पाचारण केले होते. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. गेल्याच महिन्यात छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

भुजबळांच्या मालमत्तेसंदर्भात माहिती देणाऱया काही महत्त्वाच्या लिंक्स-
* छगन सदन तेजोमय..
*
भुजबळ पिता-पुत्रांची मालमत्तेत स्पर्धा
* छगन भुजबळांची संपत्ती २६०० कोटी रुपये-सोमय्या
* दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
* ‘सदन’भुजबळ!