महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मनसुबे विशेष न्यायालयाने बुधवारी उधळून लावले. कुटुंबीयांसमवेत होळी साजरी करायची असल्याने त्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची भुजबळांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे भुजबळांना यंदाची होळी आर्थर रोड कारागृहातच साजरी करावी लागली.
दोन दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत काढल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यामुळे भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहातील ‘अंडासेल’मध्ये आहेत. होळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करू द्यावा, या मागणीसाठी भुजबळांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. तसेच तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली होती.
भुजबळ हे जागरूक नागरिक असण्यासोबतच उत्तम प्रशासक आहेत. त्यांनी सत्तेत असताना त्याची झलकही दाखवली आहे. मात्र सध्या ते राजकीय सुडाचे बळी ठरले आहेत, असा दावा करीत त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) असा जामीन देण्याची तरतूद नाही. त्यामुळे भुजबळांच्या जामीन अर्जाला अर्थ नाही, असा दावा ‘ईडी’चे वकील हितेन वेणेगावकर यांनी करत त्यांच्या जामिनाला विरोध केला.
न्यायालयानेही ‘ईडी’चा हा युक्तिवाद मान्य करत भुजबळांच्या कुटुंबीयांसोबत होळीचा सण साजरा करण्याच्या इच्छेवर पाणी फेरले.