लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्या कारणांसाठी माझी चौकशी करण्यात येत आहे. ते निर्णय मी एकट्याने घेतलेले नाहीत. प्रशासकीय मान्यतेनंतर मंत्रिमंडळाच्या संमतीने ते निर्णय घेण्यात आले असल्याचे राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिक, पुणे, मनमाड आणि येवला येथील घरांवर आणि कार्यालयांवर मंगळवारी छापे टाकले. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी आपण पदाचा कसलाही गैरवापर केला नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करतो आहोत. मात्र, ज्या कारणांसाठी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते निर्णय महिन्या दोन महिन्यांत घेतलेले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱयांच्या संमतीनंतर मंत्रिमंडळाच्या संमतीने पूर्ण विचाराने ते घेण्यात आले आहेत. मात्र, आता त्यासाठी मला जबाबदार धरून चौकशी करण्यात येते आहे. माध्यमांमध्ये आमच्या कुटुंबाच्या मालमत्तेसंदर्भात जी चर्चा सुरू आहे ती निरर्थक आहे. अनेक घरे आम्हाला वारसाहक्काने मिळाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईविरोधात आपण न्यायालयात बाजू मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.