05 August 2020

News Flash

शिवशाहीच्या इतिहासाला पडद्यावर उजाळा

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक  ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

शिवाजी महाराज यांच्यासह बाजीप्रभू, हंबीरराव यांच्यावरील चित्रपटांची वर्दी

मुंबई : ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि बॉक्स ऑफिस यांचे गणित हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला चांगलेच जमल्याने ‘तान्हाजी’, ‘मनकर्णिका’, ‘केसरी’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’ या चित्रपटांपाठोपाठ इतिहास घडविणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शिवाजी महाराज यांच्यावरील तीन चित्रपट, ‘जंगजौहर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशी ऐतिहासिक चित्रपटांची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळेल. अनेक नामांकित निर्मिती संस्था या चित्रपट निर्मितीत गुंतल्या आहेत.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक  ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हिंदीत बाजीराव मस्तानी, पद्मावत, मनकर्णिका, तान्हाजी तसेच मराठीत फर्जंद, हिरकणी, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटांनी व्यावसायिक यश मिळवले. याचपाठपाठोपाठ वर्षभरात जंगजौहर, सरसेनापती हंबीरराव मोहिते हे चित्रपट प्रदर्शित आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर बुधवारी दिग्दर्शक नागराज मंजुळे याने समाजमाध्यमावरून ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती राजा शिवाजी’ या नवीन चित्रपटांची घोषणा केली. नागराज मंजुळे याचे दिग्दर्शन, अजय-अतुलचे संगीत आणि रितेश देशमुख याची निर्मिती असलेल्या ‘शिवत्रयी’ मालिकेतील चित्रपटांकडून प्रेक्षकांना मोठय़ा आशा आहेत. या तिन्ही चित्रपटाची निर्मिती नागराजच्या ‘आटपाट प्रॉडक्शन’ आणि रितेशच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून केली जाईल.

याशिवाय ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंग जौहर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. पावनखिंडीची लढाई आणि साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या राजकारणाची कथा यात केंद्रस्थानी असेल. जून महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच रायगडावर पार पडला. तसेच, सध्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’चे चित्रीकरण महाबळेश्वर, पाचगणी, भोर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होईल. या सर्व चित्रपटांची कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, राजांच्या शिलेदारांनी गाजवलेले पराक्रम या भोवती फिरते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचेल अशी आशा व्यक्त होत आहे.

रितेशच्या चित्रपटाची झलक

दोन वर्षांपूर्वी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट करणार असल्याचे सांगितले होते. २५० कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाची निर्मिती रितेश – जेनेलिया डिसूझा देशमुख आणि रवी जाधव करणार असल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली होती. या चित्रपटात सलमान खान छोटय़ा भूमिकेत असल्याने उत्सुकता होती. मात्र, दोन वर्षे रखडलेल्या या चित्रपटाची छोटी झलक शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 12:56 am

Web Title: chhatrapati shivaji maharaj baji prabhu hambirrao movie akp 94
Next Stories
1 मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेची दवंडी
2 सरकारी इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी अशक्य
3 न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदलीची शिफारस
Just Now!
X