15 July 2020

News Flash

ऐतिहासिक वस्तूंची ऐट कायम ठेवण्यासाठी जिवाचे रान

‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’तील निवासी कर्मचाऱ्यांची चिकाटी

‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’तील निवासी कर्मचाऱ्यांची चिकाटी

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : इतिहास आणि पुराणवस्तूंचे जतन ही संकल्पना आपल्यापेक्षा अधिक पाश्चिमात्य राष्ट्रांना प्रिय. एरव्ही मुंबईच्या प्रवेशद्वारानजीक असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त टाळेबंदीपूर्वकाळातही फार गर्दी होती असे नाही. पण भारताचा हजारो वर्षांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपणाऱ्या या संस्थेतील कर्मचारी टाळेबंदीमध्येही मूल्यवान दस्तावेज आणि आपल्या पूर्वसुरींचे दाखले सांभाळण्यासाठी राबत आहेत.

विसाव्या शतकाच्या आरंभी भारताच्या भेटीवर येणाऱ्या पंचम जॉर्जच्या स्वागत आणि सरबराईसाठी ज्या संस्थांची उभारणी ब्रिटिशांच्या मदतीने एत्तदेशीयांकडून झाली, त्यात या वस्तूसंग्रहालयाचाही समावेश होतो. इतिहासप्रेमी, अभ्यासक यांचा या संग्रहालयात राबता असतो, कारण सिंधू संस्कृतीपासून गुप्त,मौर्य,चालुक्य आणि राष्ट्रकुट कारकीर्दीतील दुर्मीळ वस्तू यात पाहायला मिळतात. संग्रहालयात पाषाण मूर्ती, प्राचीन नाणी, वस्त्रे, चित्रांच्या प्रतिकृती, अलंकार, हस्तिदंताच्या वस्तू, जपानी वस्तू, पाश्चात्य चित्रे अशा विविध वस्तूंची एकूण १४ दालने आहेत. अगदी सोळाव्या शतकातील हस्तलिखिते, तेराव्या शतकातील कांस्य धातूच्या मूर्ती, सोन्याचे शिवकालीन होन असा दुर्मीळ ठेवा या संग्रहालयात आहे.संग्रहालय बंद करावे लागले तर काय करायचे, याबाबत टाळेबंदीच्या आधीच एक बैठक झाली होती. १० मार्चपासून संग्रहालय प्रेक्षकांसाठी बंद झाले. यावेळी सर्वात प्रथम संग्रहालयाच्या चहुबाजूंच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले. अतिमौल्यवान वस्तूंच्या दालनांमधील वातावरण अति थंड झाले तर वातानुकूलन यंत्रातून पाणी वाहण्याची शक्यता असते. त्यामुळे यंत्रांचे तापमान वाढवण्यात आले. धोक्याचा इशारा देणारे गजर व्यवस्थित असल्याची खात्री करून घेण्यात आली. काही अति मौल्यवान वस्तू आणि बाल संग्रहालयातील वस्तू कलाकृती संरक्षण केंद्रात हलवण्यात आल्या, जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व वस्तूंना कडेकोट बंदोबस्तात ठेवता येईल.

कसे शक्य झाले?

या संग्रहालयाची जबाबदारी सध्या येथील निवासी अधिकारी पार पाडत आहेत. ब्रिटीशांची दूरदृष्टी इतकी होती की, त्यांनी संग्रहालयाची वास्तू उभी करताना वास्तूच्या आवारात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे काही वरीष्ठ अधिकारी, काही स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सध्या संग्रहालयाच्या आवारातच राहून वास्तू आणि वस्तूंची काळजी घेत आहेत. टाळेबंदीनंतर जेव्हा संग्रहालय उघडेल तेव्हा ते पूर्वीच्याच दिमाखात उभे राहिले पाहिजे, असा आग्रह येथील संरक्षक अनुपम साह आणि अभिरक्षक मनिषा नेने यांचा आहे.

कठोर तपासणी..

एरव्ही या दालनांची दिवसातून दोनदा तपासणी होते. टाळेबंदीत दिवसातून एकदा प्रत्येक दालनाचे निरीक्षण केले जाते. प्रत्येक दालन दर सहा दिवसांनी तपासले जाते. सर्व वस्तू जागच्या जागी असल्याची खात्री करून घेतली जाते. एक दिवस भिंतीवर वाळवी दिसून आली. तिचा त्वरीत बंदोबस्त क रण्यात आला. एरव्ही सुरक्षारक्षक असलेल्या काही ठिकाणी कॅमेऱ्यांची गरज नसते. मात्र टाळेबंदी सुरू झाल्यानंतर कॅमेऱ्यांची दिशा आवश्यक तेथे वळवण्यात आली.

बाहेरची परिस्थिती वाईट असली तरी आम्ही पळ काढू शकत नाही. कारण, देशाचा सांस्कृतिक ठेवा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. नाहीतर, आम्ही पुढच्या पिढीला काय उत्तर देणार ?

— अनुपम साह, संरक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 1:37 am

Web Title: chhatrapati shivaji maharaj museum employees working in lockdown zws 70
Next Stories
1 निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
2 सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईत ४० हजारांहून अधिक करोनाबाधित
3 Coronavirus : सार्वजनिक वाहतुकीलाही विळखा
Just Now!
X