शिवाजी पार्क संवर्धनावरून शिवसेना-मनसे यांच्यात संघर्ष

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या सभोवतालच्या रहिवाशांना धुळीपासून मुक्ती देण्यावरून राजकीय आखाडा रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या आग्रहाखातर मैदान संवर्धनाचा प्रकल्प हाती घेण्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली असून असाच प्रकल्प मनसेने काही वर्षांपूर्वी हाती घेतला होता. आता सेनेचा उत्साह पाहून मनसे पुन्हा मैदानात जलसंचयन प्रकल्प उभा करण्यात रस घेताना दिसत आहे. उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून प्रकल्प उभारणीसाठी परवानगी देण्याची मागणी दस्तुरखूद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र पठवून केली आहे.

शिवाजी पार्क मैदानातून सतत उडणाऱ्याधुळीचा आसपास राहणाऱ्यारहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. धुळीमुळे रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. गेली काही वर्षे नागरिक  त्रासलेले असतानाही न सुटलेला प्रश्न आता पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय होण्याची चिन्हे आहेत. मैदान संवर्धन आणि शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आणि मनसे आमनेसामने उभे ठाकले आहेत.

प्रकल्प कुणाचा?

काही वर्षांपूर्वी मनसेने मैदानात वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवून हा शिवाजी पार्क मैदानाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. धूळ उडू नये म्हणून मैदानात पाणी फवारण्यास सुरुवात केली. मात्र देखभालीअभावी या प्रकल्पाची वाताहात झाली. परिणामी पुन्हा रहिवाशांना धुळीच्या समस्येने ग्रासले आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिवसेने सरसावली असून रहिवाशांच्या धूळमुक्तीसाठी  प्रकल्प राबविण्याचा तगादा शिवसेनेने प्रशासनाच्या मागे लावला होता. मैदानात पाणी उपलब्ध नसल्याने नवे स्रोत निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार प्रशासनाने पाच कूपनलिकांचा समावेश असलेल्या पाच विहिरी मैदानामध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अन्य काही कामेही करण्यात येणार आहेत. या कामांसाठी चार कोटी सात लाख रुपये खर्च अपेक्षित असून या कामासाठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत. रहिवाशांच्या धूळमुक्तीसाठी शिवसेनेने पुढाकार घेताच पुन्हा मनसे सरसावली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून मैदानात उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून जलसंचयन प्रकल्प उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर पालिकेने सुरू केलेली निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी, असेही त्यांनी पत्रात सूचित केले आहे.

दादरच्या बालेकिल्ल्यासाठी…

मुंबई महापालिकेच्या २०१२ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत दादरमधील अनेक प्रभाग मनसेने काबीज केले होते. दादरमधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. मुंबई महापालिकेची पुढील वर्षी निवडणूक होऊ घातली आहे. दादरकरांमध्ये शिवाजी पार्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे धुळीच्या समस्येचे निराकरण करून मतदारांची मने जिंकण्यासाठी उभयपक्षांमध्ये अहमहमिका सुरू झाली आहे.

रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पण मनसे आयत्या बिळावर नागोबा बनून प्रकल्प काबीज करू पाहात आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवर हा प्रकल्प होणारच. – विशाखा राऊत, सभागृह नेता