25 February 2021

News Flash

जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप

पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे

जे. डे

पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्यासह एकूण ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान याआधी पत्रकार जिग्ना वोरा हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याशिवाय सिमकार्ड पुरवल्याचा आरोप असणाऱ्या पॉल्सन जोसेफ याचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मकोका न्यायालयाने हा निर्णय दिला. छोटा राजन सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता.

सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले होते. फिर्यादी वकिलांनी समाजातील चौथ्या स्तंभावर हल्ला झाला असल्या कारणाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ग्राह्य धरत जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती.

११ जून २०११ रोजी डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेले डे यांनी हिरानंदानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या गुन्हय़ाचा सुरुवातीचा तपास मुंबई गुन्हे शाखेने केला. या तपासातून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. पुढे डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली गेली. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण १२ आरोपींना मोक्कान्वये गजाआड केले गेले. त्यात पत्रकार जीग्ना वोराचाही समावेश होता. जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे.

तत्कालीन सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्या देखरेखीखालील अरुण चव्हाण, नंदकुमार गोपाळे, श्रीपाद काळे, रमेश महाले आणि पथकाने तपास करत पुरावे गोळा केले होते.

मृत्यूआधी डे यांनी ‘चिंधी रॅग्ज टू रिचेस’ या पुस्तकाचे टिपण तयार केले होते. या पुस्तकातून डे बदनामी करणार, अशी खात्री पटल्याने तसेच डे यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी टोळीकडून धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती पुरवण्यात आल्याने राजनने सतीश काल्याला हत्येचे आदेश दिले होते.

सतीश काल्या, अनील वाघमोडे, अभिजीत शिंदे, नीलेश शेडगे, अरुण डोके, मंगेश आगावणे, सचिन गायकवाड या आरोपींचा डे यांच्या हत्येत थेट सहभाग होता. राजनचा बालपणीचा मित्र विनोद असरानी ऊर्फ विनोद चेंबूर याने मुलुंडच्या हुमा पॅलेस बारमध्ये डे यांची ओळख पटवून दिली. पॉलसन जोसेफ आणि रवी रत्तेसर यांनी आरोपींना ग्लोबल सिमकार्ड पुरवली, आर्थिक मदतही केली. तर डे यांच्या विरोधात राजनचे माथे भडकावण्याचे काम जीग्नाने केले, असा आरोप गुन्हे शाखेने आरोपपत्रातून ठेवला. राजनला अटक करण्यात आल्यानंतर अन्य गुन्हय़ांसोबत डे हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 11:59 am

Web Title: chhota rajan is guilty in j dey murder case
Next Stories
1 पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने चार महिन्याच्या बाळाला आपटले जमिनीवर
2 टोल वाचवण्यासाठी बदलला मार्ग; बस दरीत कोसळून ३ ठार, २२ जखमी
3 धक्कादायक! बीडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची काढली धिंड
Just Now!
X