गुन्हेगाराला आश्रय दिल्याच्या आरोपावरून पोलिसांची कारवाई

मुंबई महापालिका प्रशासनाला अंधारात ठेवून एका कैद्याला तब्बल चार महिने रुग्णालयात आश्रय दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र वाडिवाला यांना शनिवारी आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. कैद्याला रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर त्याच्याकडून एका व्यावसायिकाच्या फायद्यासाठी थेट उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला फोन करून खटला पुढे ढकलण्यास सांगण्याचा आरोप डॉ. वाडिवाला यांच्यावर आहे. आझाद मैदान पोलिसांनी याआधीच त्या व्यावसायिकालाही अटक केली आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले.

जवळपास ५०० गुंतवणूकदारांचे १९ कोटी रुपये बुडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शेखर चंद्रशेखर याला २०१५ मध्ये अटक केली होती. त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल चार महिने चंद्रशेखर याला रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्याबदल्यात प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांना भरपूर आर्थिक लाभ झाल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. चंद्रशेखरला रुग्णालयात ठेवण्यासाठी राजावाडीच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांच्यावर डॉ. वाडिवाला यांच्यामार्फत दबाव टाकण्यात येत असल्याचे चौकशीअंती उघड झाले. त्यानंतर या प्रकरणी डॉ. महेंद्र वाडिवाला यांना निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, दीड महिन्यापूर्वी उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाला आपण केंद्रीय विधि मंत्र्याचे स्वीय सचिव बोलत असून नवीनचंद्र हेगडे (६३) यांचे सुनावणीस येणारे प्रकरण काहीसे पुढे ढकला, अशी विनंती फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने केली. न्यायाधीशांनी याची माहिती पोलिसांना देत, तो फोन कोणी केला होता, याविषयी तपास करण्यास सांगितले. आझाद मैदान पोलिसांनी तपास केला असता.

चंद्रशेखर यानेच हा फोन केल्याचे स्पष्ट झाले. हेगडे याने हा फोन करण्यासाठी चंद्रशेखरला बक्कळ पैसे दिल्याचेही स्पष्ट झाले. २६ जुलै रोजी आझाद मैदान पोलिसांनी हेगडे याला अटक केली. त्यानंतर हेगडे याच्या चौकशीत त्याच्या एका प्रकल्पात भागीदार असलेल्या डॉ. वाडिवाला यांनीच मालमत्तेविषयी उच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरण पुढे ढकलण्यासाठी चंद्रशेखर मदत करू शकतो, असे सांगितल्याचे स्पष्ट झाले. दोघांची भेटही डॉ. वाडिवाला यांनी घालून दिली. डॉ. वाडिवाला यांचा यात सक्रिय सहभाग असल्याचे आढळल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना शनिवारी बोरिवलीच्या घरातून अटक केली.

  • वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र वाडिवाला यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
  • न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

 

अबु जुंदालसह ११ जणांच्या शिक्षेचा उद्या निर्णय

मुंबई : २००६ साली औरंगाबाद येथून शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त केल्याप्रकरणी दोषी ठरवलेला आरोपी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल याच्यासह ११ जणांच्या शिक्षेचा निर्णय मंगळवारी ‘विशेष मोक्का न्यायालय’ सुनावणार येणार आहे. या सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे विशेष न्यायालयाकडे शनिवारी करण्यात आली.

गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगलीचा सूड म्हणून गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी या आरोपींना गुरूवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. याविषयी शुक्रवारी आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. शनिवारी सरकारी वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला आणि या आरोपींना जन्मठेप सुनावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आरोपींना त्यांनी केलेल्या कृत्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांना शिक्षेत दया दाखवणे योग्य होणार नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालय मंगळवारी शिक्षा सुनावणार आहे.