मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा लक्षात घेऊन त्याबाबतची मंडळांची स्पष्ट भूमिका राज्य शासन न्यायालयात मांडेल आणि गरज भासल्यास कायद्यातही बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपच्या सांस्कृतिक जनाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत न्यायालयाने काही र्निबध घातले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याबाबत भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे. पण नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, वाहतूक नियोजन केले जाईल, तसेच आपत्कालीन आराखडा तयार केला जाईल. याबाबत राज्य सरकार मंडळांच्या पाठीशी राहणार असून, मंडळांचे हे मुद्दे शासन न्यायालयात मांडेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिली.