शिवसेनेला १२ आमदारांच्या नियुक्तीची आशा

मुंबई : विधान परिषदेवरील १२ नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून राजभवन आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्माण झालेला बेबनाव, राज्यपालांना राज्य सरकारच्या विमानातून प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यावर उभयांमध्ये टोकाला गेलेले संबंध या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी  राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने उभयतांमधील संबंध सुधारणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर १२ आमदारांची नियुक्ती करून राज्यपालांनी वाढदिवसाची भेट द्यावी, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यापासून राजभवन आणि मुख्यमंत्र्यांमधील संबंध तणावपूर्ण होते. विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी यादी गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे सादर के ली, पण राज्यपालांनी यावर अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारच्या मालकीच्या विमानातून डेहराडूनला जाण्यासाठी बसले, पण मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन खात्याची परवानगी नसल्याने राज्यपालांना विमानातून उतरावे लागले होते. तेव्हापासून उभयतांमधील संबंध ताणले गेले होते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा चर्चेला गेला होता. या साऱ्या पाश्र्वाभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्यानेच दिल्ली भेटीचा हा परिणाम का, अशी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे अभिष्टचिंतन के ले. या वेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

कोंडी सुटणार का ?

विधान परिषदेवरील १२ जागांवर नियुक्ती करून राज्यपालांनी राज्यातील जनतेला वाढदिवसाची भेट द्यावी, अशी अपेक्षा शिवसेना प्रवक्ते , खासदार संजय राऊत यांनी व्यक्त के ली. मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवरील नियुक्ती करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेपाची विनंती ठाकरे यांनी के ली होती. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली होती व ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला होता.

पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित के ला होता. आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे विनंती के ल्याने कोंडी सुटेल, असा विश्वाास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.