नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणूक होणार असून त्यात कसलाही दगाफटका होऊ नये आणि महाविकास आघाडी एकसंध राहावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपासून विभागवार आमदारांचे स्नेहभोजन आयोजित करत तिन्ही पक्षांच्या आमदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना ती जबाबदारी सोपवली. त्यामुळे पटोले यांना विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने हे पद रिक्त झाले. विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी गुप्त मतदान होत असते. त्यामुळे भाजपने उमेदवार उभा करून सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न के ल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊन सरकार अडचणीत येऊ शकते.

त्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां या सरकारी निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश व कोकण असे विभागवार आमदारांचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी तिन्ही पक्षांच्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.

राठोड यांच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा

एकीकडे विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक होणार असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी बोलावलेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत राठोड उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. शिवसेनेने राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त फे टाळले. पोलिसांचा अहवाल आल्याशिवाय त्यांच्याकडून राजीनामा घेऊ नये, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यानुसारच तूर्तास या विषयावर मौन बाळगण्यात येत आहे.