हजारो वृद्धांना दिलासा मिळणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केल्यापासून गेल्या सात महिन्यांत सुमारे साडेचार लाख शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आता वृद्धांमधील वाढत्या सांधेदुखीची गंभीर समस्या व गुडघेबदल (नी रिप्लेसमेंट) तसेच हिप रिप्लेसमेंटच्या खार्चीक शस्त्रक्रियांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ‘सांधेबदल शस्त्रक्रिया’ मोहीम घेतले असून या अंतर्गत महाराष्ट्रात जवळपास दहा लाख शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात वृद्धांमध्ये गुडघेदुखीचा आजार दिसून येत असून यावर गुडघेबदल शस्त्रक्रिया हा एक प्रमुख पर्याय आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या तंत्रात बरीच प्रगती झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास चार कोटी लोकसंख्या ही ४० वयोगटावरील असून त्यापैकी सुमारे ४० लाख लोकांना सांधेदुखीचा त्रास असल्याचा अहवाल आहे. यापैकी जवळपास दहा लाख लोकांना नी रिप्लेसमेंट अथवा हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची आवश्यकता असून यासाठी येणारा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक वृद्धमंडळींना चालणेही कठीण झाले आहे. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात सुमारे दोन ते पाच लाख रुपये खर्च येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत एक बैठक घेऊन कशा प्रकारे उपाययोजना करता येईल याचा आढवा घेतला. त्यानंतर या मिशन सांधेबदल शस्त्रक्रियेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पुणे येथील बी.जी.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाते व विख्यात अस्थिशल्यविशारद डॉ. अजय चंदनवाले यांच्यावर सोपविण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय व पालिका वैद्यकीय महाविद्यालये तसेच धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारी विश्वस्त रुग्णालये यांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी या सर्व रुग्णालयांतील अस्थशल्यविशारदांना व त्यांच्या साहाय्यकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चीही या उपक्रमासाठी मदत घेतली जाणार आहे. अलीकडेच डॉ. चंदनवाले यांनी सोलापूर येथे ‘आयएमए’बरोबर एक बैठक घेतली. लवकरच राज्यातील प्रमुख जिल्ह्य़ांमध्ये अस्थिशल्यविशारदांच्या संघटनांसमवेतही बैठक घेऊन जिल्हावार शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची यादी तयार केली जाणार आहे. याबाबत डॉ. चंदनवाले यांना विचारले असता ते म्हणाले, या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च हा ‘सीएसआर’मधून तसेच मुख्यमंत्री निधीमधून प्रामुख्याने केला जाईल. गरीब रुग्णांवर या योजनेत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून काही ठिकाणी अल्प दरात किंवा केवळ कृत्रिम सांध्याचा खर्च घेऊन ही शस्त्रक्रिया केली जाईल. राज्यातील अस्थिशल्यविशारदांच्या संघटनांशी आम्ही संपर्कात असून ‘आयएमए’सारख्या संघटनेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधानांच्या आरोग्य योजनेतूनही यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदतनिधीतून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ केली. पूर्वी मुख्यमंत्री मदतनिधीतून केवळ पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत मिळत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती वाढवून पन्नास हजार ते तीन लाख रुपयांपर्यंत केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात कॅन्सर रुग्णांना तसेच हृदयविकारासह खार्चीक शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यापाठोपाठ मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केल्यामुळे लाखो रुग्णांना दृष्टी मिळाली आहे तर आता सांधेबदलाची शस्त्रक्रिया मोहीम राबविणार असल्यामुळे हजारो वृद्धांना आरामात चालणे शक्य होणार आहे.