मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी सुजाण वाचकांना थेट संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता’ दृष्टीकोन’ या ऑनलाईन उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘गुगल हँगआऊट’च्या माध्यमातून हा संवाद साधता येणार आहे.
संपादक आपले मत अग्रलेखातून किंवा लेखाद्वारे मांडतात. किंवा मुख्यमंत्री आपल्या निर्णयांमधून राज्याचे धोरण स्पष्ट करतात. यावर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकांना आपली मते वर्तमानपत्रातून मांडण्याची संधी मिळते. परंतु, हा संवाद एकतर्फीच असतो. ‘लोकसत्ता दृष्टीकोन’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व संपादक यांना एकाचवेळी प्रश्न विचारण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
मराठी वर्तमानपत्राच्या इतिहासात या प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात आहे. त्यासाठी उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम indianexpress-loksatta.go-vip.net या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी त्यांना तीन प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. त्यानंतर त्यांच्यासाठी ‘गुगल हँगआऊट’ खुले होईल आणि त्यांना संवादाचा मार्ग मोकळा होईल.