कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांची कसोटी; मुख्य लढत भाजप-शिवसेनेतच
राज्यात सत्तेत आल्यानंतर नवी मुंबई, वसई-विरार, अंबरनाथ, बदलापूर या मोठय़ा शहरांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने अपयशाची ही मालिका कल्याण-डोंबिवलीमध्ये खंडित व्हावी यासाठी भाजपने सारी शक्ती पणाला लावली आहे. कल्याणमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरू शकते. शिवसेना पुढे जाऊ नये, हा भाजपचा प्रयत्न असून, सत्तेतील दोन मित्र पक्षांमध्येच लढत होईल, अशी चिन्हे आहेत.
गेल्या नोव्हेंबरमध्ये सत्तेत आल्यापासून झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई-विरार महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपचा फारसा प्रभाव पडू शकला नाही. पालघर जिल्हा परिषदेत मिळालेल्या यशाचा अपवाद वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला मागे टाकले आहे. औरंगाबादमध्ये युतीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तर भाजपला दुय्यम भूमिका वठवावी लागली. गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गजाचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केल्याने नवी मुंबईत भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शिवसेनेबरोबर युती करून भाजपने आधीच नांगी टाकली आणि फक्त सहा नगरसेवक निवडून आल्याने भाजपची पार धुलाई झाली. वसई-विरारमध्ये कसाबसा एक नगरसेवक निवडून आला. अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन मोठय़ा नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पराभवाचा धक्का दिला. भंडारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता गमवावी लागली तर गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची पीछेहाट झाली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण विदर्भावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या भाजपला दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपला पराभवाची धूळ चारली होती. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत असले तरी गेल्या दहा महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा तेवढा प्रभाव पडलेला नाही. विधानसभा निवडणुकीत मोदी-लाटेत भाजपची जी घोडदौड झाली तसे यश पक्षाला महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांमध्ये मिळालेले नाही. भाजपमध्ये आधीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अन्य नेतेमंडळी एकत्रित झाली आहेत. कल्याण-डोंबिवलीत पराभव सहन करावा लागल्यास मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कागाळ्या करण्यास पक्षांतर्गत विरोधकांना संधी मिळणार आहे.

शिवसेनेची धास्ती
कल्याण-डोंबिवलीची सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेनेने सारी शक्ती पणाला लावली आहे. शिवसेनेला शह देण्याकरिताच निवडणुकीच्या तोंडावर २७ गावे वगळण्याची अधिसूचना काढण्यात आली. या २७ गावांमध्ये शिवसेना आघाडी घेण्याची भाजपला भीती आहे. कल्याण-डोंबिवली तसेच कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिवसेना हे सत्तेतील मित्र पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता कमी आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने काँग्रेस आमदार महादेव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीबरोबर युती केली आहे. कल्याणमध्ये युतीत कोणी माघार घ्यायची हा कळीचा मुद्दा आहे. चर्चेचा घोळ घातला तरी दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची सारी तयारी केली आहे.

मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीही रिंगणात
गेल्या निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेसमोर हे यश कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. तेव्हा मनसेची हवा तयार झाली होती, पण तसे वातावरण यंदा दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.