ललित मोदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना प्रसिद्धीमाध्यमांनी ‘क्लीन चीट’ दिली असली तरी आम्ही दिलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने मारिया यांच्यावर कारवाईचे संकेत प्राप्त होत आहेत. मात्र सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांची पाठराखण केल्यावर मारिया यांच्यावर कारवाईचा बडगा उभारणे कितपत योग्य याचा दिल्लीच्या पातळीवर विचार झाल्यावरच कारवाई होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मारिया यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस हे फारसे खूश नसल्याचे मंत्रालयात बोलले जाते. ललित मोदी यांच्या भेटीमुळे कारवाई झाल्यास त्याचे पडसाद भाजपच्या राजकारणावर उमटू शकतात. स्वराज आणि वसुंधरा राजे यांना पाठीशी घातले, पण पोलीस अधिकाऱ्याचा बळी दिला, अशी चर्चा होऊ शकते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस मारियाप्रकरणी कोणताही निर्णय घेणार नाहीत, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते. दरम्यान, गृहविभागाचे अतिरिक्त गृहसचिव के. पी. बक्षी यांनी या प्रकरणी मारिया यांच्या स्पष्टीकरणावर आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे तातडीने रात्री सादर केला. त्यात त्यांनी मारिया यांची कृती अयोग्य असल्याचे मत नोंदविल्याचे समजते.  गैरव्यवहाराचा आरोप असलेले आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्या गेल्या वर्षी लंडनमध्ये घेतलेल्या भेटीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मारिया यांना हटविले जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी मोदी यांना केलेल्या मदतीचे काही केंद्रीय मंत्री व सरकार समर्थन करीत असले तरी मारिया हे सनदी अधिकारी असल्याने त्यांना या प्रकरणात अडकवले जाण्याची चिन्हे आहेत. पोलीस महासंचालक संजीव दयाळ हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असून त्या वेळी मारिया यांना महासंचालकपदी बढती मिळणार असून तेव्हा नवीन पोलीस आयुक्तांबाबत निर्णय घ्यावा लागणारच आहे. पण आता मोदीप्रकरणी मारिया यांच्यावर कारवाई केली नाही, तर त्यातून जनतेमध्ये योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे बदली केली जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मारिया यांच्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.