मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर गेल्याने पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला सुरुवात झाली. मात्र, सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस आणि विद्यासागर राव यांच्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. विधीमंडळाच्या नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये आदिवासींच्या विकासासह इतर अनेक मुद्द्यांचा समावेश होता. सुमारे ५० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. येत्या सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. या विस्तारामध्ये स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षालाही स्थान दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अधिवेशन सुरू होण्याला तीन दिवस उरले तरी अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. विविध कारणांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आता हिवाळी अधिवेशनानंतरच होईल, अशीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.
शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांना आणि विस्तारात समावेश होणाऱ्या नवीन मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळावीत, ही शिवसेनेची भूमिका असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा पूर्ण होऊ न शकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्याची चिन्हे वर्तविण्यात आली आहेत. शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी नसून, शिवसेनेनेही अजून आपल्या मंत्र्यांची नावे पाठविली नसल्याने शिवसेनेला वगळून विस्तार होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेत महामंडळांचे वाटपही अजून अनिर्णित असल्याने व मंत्रिपदांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याने असंतोष टाळण्यासाठी विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विस्तारात भाजपच्या पाच किंवा सहा मंत्र्यांना शिवसेनेच्या दोन, स्वाभिमानी पक्ष व ‘रासप’ यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार आहे.