मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठका झाल्या. पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत व काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेच्या सोबत उभे असल्याचा संदेश त्यातून देण्यात आला.

या प्रकरणात विरोधी पक्ष भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यातून महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे या प्रकरणापासून थोडे लांब राहात असल्याचे चित्र असल्याने महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर सोमवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषींवर कारवाई होईल. केवळ आधी चौकशी करून मगच दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. नंतर काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी भाजपच्या राज्यातील नेते महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी करत असल्याची टीका केली. यातून महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचे आणि शिवसेना एकटी पडली नसल्याचे संकेत देण्यात आले.

दोन मंत्र्यांचा राजीनामा शक्य – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील संजय राठोड या मंत्र्यास राजीनामा द्यावा लागला. लवकरच आणखी दोन मंत्री राजीनामा देतील, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले.राजीनामा देणारे मंत्री अनिल देशमुख आहेत का, अशी विचारणा केली असता ‘थांबा व प्रतीक्षा करा’ असे नमूद केले.सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे ते म्हणाले.