शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५३८० कोटी मंजूर

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ शनिवारी घेतल्यानंतर गेले दोन दिवस मंत्रालयापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कामाला लागले. विधान भवनमध्ये यशवंतराव चव्हाण यांना आणि मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीतून ५३८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

शपथविधी पार पडल्यावर मुख्यमंत्री मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे, पत्रकार परिषदेत नवीन धोरणांची घोषणा करणे, सहाव्या मजल्यावर दालनात जाऊन पदभार स्वीकारणे आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणे, अशी प्रथा आणि परंपरा आहे. मात्र यावेळी या प्रथा आणि परंपरेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालन केले नाही. शनिवारी शपथविधी झाल्यानंतरही दोन दिवस मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयात आले नव्हते. त्यांनी केवळ पक्षाच्या कार्यालयातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. तर अजित पवार हे दोन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रथा परंपरांचे पालन न केल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते.

या पाश्र्वभूमीवर सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान भवन गाठले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर फडणवीस मंत्रालयात गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन केले आणि कामाला लागले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात गेलेच नाहीत.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीतून ५३८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार घेतल्यानंतर घेतला.

कर्करोगग्रस्त महिलेला मदत

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीच्या धनादेशावर केली. दादर येथील एका कॅन्सर पीडित महिलेला वैद्यकीय उपचारांसाठी एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी दिला. राष्ट्रपती राजवटीमुळे अनेक रुग्णांना मदत मिळेनाशी झाल्यावर महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या कार्यालयात मदतीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कुसुम वेंगुर्लेकर या कॅन्सरग्रस्त महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख २० हजार रुपयांचा धनादेश दिला.