अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात बिनबुडाचे तर्क, आरोप समाजमाध्यमांद्वारे पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तीला मुंबईच्या सायबर पोलिसांनी गुरुवारी नवी दिल्लीतून अटक केली. विभोर आनंद असे या तरुणाचे नाव आहे. सुशांत, दिशा प्रकरणात तो ट्विटर, फेसबुक आणि यूटय़ूबच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस दल, अरबाज खानसह अन्य कलाकारांची सातत्याने बदनामी करीत होता.

याबाबत सायबर पोलिसांकडे अनेक तक्रोरी प्राप्त झाल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात एका महिलेने दिलेल्या तक्रोरीवरून सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. समन्स जारी करून त्याला चौकशीसाठी हजर राहाण्याच्या सूचनाही केल्या. मात्र चौकशीस हजर न राहाता अफवा, खोटी माहिती, बदनामीकारक साहित्य तो पसरवत होता, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सुशांत, दिशा मृत्यू प्रकरणावरून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अरबाज खान, सूरज पांचोली, शोविक चक्रवर्ती यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तपासावरून मुंबई पोलिसांची सातत्याने बदनामी केली. अभिनेता अरबाजला सुशांत, दिशा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली, असा दावाही त्याने यूटय़ूबद्वारे के ला होता. त्यानंतर अरबाजने विभोरविरोधात मुंबईच्या न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. या प्रकरणी सप्टेंबरअखेरीस झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विभोरसह अन्य प्रतिवादींना समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह साहित्य काढून टाकण्याची सूचना केली होती. दोन दिवसांपूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांवरही त्याने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि नेटिझन्सनी त्याला लक्ष्य केले.

झाले काय? : पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपीला दिल्ली येथून अटक केली. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने ट्विटरसह फेसबुक आणि यूटय़ूबच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी स्वत:ला वकील भासवत असून त्याबाबतही खातरजमा केली जाईल, असे पठाण यांनी स्पष्ट केले.