पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन काँग्रेसशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात झालेल्या घोषणाबाजीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये, असा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. यानुसारच मोदी यांच्या गुरुवारच्या नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी होणार नाहीत.
गेल्या आठवडय़ात सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय समारंभात मुख्यमंत्री चव्हाण भाषण करीत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनाही मोदी यांच्या शासकीय कार्यक्रमात असाच अनुभव आला होता. त्यानंतर हुडा यांनी मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढील आठवडय़ात कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही राज्यांमध्ये मोदी शासकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करीत असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी मोदी यांच्या समारंभाला जाण्याचे टाळावे, असा निरोप काँग्रेस नेतृत्वाकडून देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोचे भूमिपूजन भाजपच्या मंत्र्यांच्या हस्ते
पुणे मेट्रोऐवजी नागपूरला केंद्रातील भाजप सरकारने प्राधान्य दिले. मंत्री हा देशाचा असतो व तो मतदारसंघापुरता मर्यादित नसतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांना मारला. भाजप सरकारने दुजाभाव केला असला तरी कुलाबा ते अंधेरी या मुंबई मेट्रो प्रकल्प-३ चे भूमिपूजन येत्या दोन-तीन दिवसांत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांच्या हस्ते केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केले.