”मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट आलं. हजारो घरं पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं. होतं नव्हतं ते वाहून गेलं, खराब झालं. पण एक गोष्ट चांगली आहे, की  या संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली.” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज जाहीर कौतुक केले. बीबीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, ”एका बाजूने या पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणं हे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. हा सगळा परिसर याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. बीडीडी चाळ व या सर्व परिसरात एक दृष्टीने देशाचाच इतिहास घडला. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं. ज्यांनी या देशातील प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. त्यांचे देखील आज या ठिकाणी स्मरण करतो. परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्वाचं मार्गदर्शनाचं काम करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचं दखील वास्तव्य या परिसरात एकेकाळी होतं, अण्णाभाऊ साठेंचं देखील होतं. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीत ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही संचार या भागात होता आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संबंध महाराष्ट्र जागृत करण्यासंबंधी कार्य करणारे आचार्य अत्रे यांचं देखील वास्तव्य या परिसरात होतं. ”

२०-३० मजली इमारती उभ्या राहतील, पण यामधला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका  –

तसेच, ”हा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक ठसा व्यक्त करणारा आहे. या ठिकाणी कोकणातील लोक राहतात, या ठिकाणी घाटावरचे लोक राहतात, घाट आणि घाटा खालच्या दोन्ही लोकांना एकसंध करण्याचं काम आज या परिसरात केलं जातंय याचा मला आनंद आहे. या चाळींमध्ये काही बदल केले पाहिजेत, अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. मालकी हक्क दिला पाहिजे. या सगळ्या मागण्या आज गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्याही पेक्षा त्यांच्या पाठीशी उभ राहण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे हे या ठिकाणी होऊ शकलं आहे.  या चाळी आज ना उद्या जाणार या ठिकाणी मोठाल्या इमारती उभ्या राहणार. माझी एकच विनंती आहे, या २०-३० मजली इमारती उभ्या राहतील. पण यामधला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका.” असंही शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवलं.