मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा; करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना

मुंबई : करोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला असल्याने लहान मुले आणि बालकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून उपाययोजना सुचविण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा कृतिगट स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

करोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील प्राणवायूनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी बालरोगतज्ज्ञांच्या कृतिगटाच्या स्थापनेची घोषणा के ली.  लशींच्या टंचाईमुळे १८ ते

४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणात होणारा गोंधळ दूर करण्यासाठी ३५ वर्षांच्या पुढील त्यातही सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार के ला असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका संभवतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी बालरोगतज्ज्ञांशी चर्चा के ली असून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी कृतिगटाबरोबरच मुलांवर उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष, खाटांची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर यांची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेमडेसिविर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मागविण्यात आलेल्या स्वारस्य देकारास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन लाख रेमेडेसिविर खरेदीसाठी संबंधित कं पन्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच अमेरिके ने देशासाठी पाठविलेल्या मदतीतून ५२ हजार रेमडेसिविर कुप्या राज्याला मिळविण्यात यश आल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच हवेतील प्राणवायू शोषून तो रुग्णांना पुरविणाऱ्या प्रकल्पांबाबतही कार्यादेश देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल. तसेच कें द्राने ठरवलेल्या कोट्याप्रमाणे राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अशा कं पन्यांवर कें द्राने कारवाई करावी, अशी मागणीही टोपे यांनी केली.

केंद्राने लशींचा पुरवठा करावा

४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी कें द्र सरकारची असल्याने लशींचा पुरवठा करावा, अशी मागणीही आरोग्यमंत्र्यांनी के ली. रशियाच्या स्पुटनिक लशीच्या खरेदी दराबाबत रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फं ड (आयडीआरएफ) यांच्या माध्यमातून चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वतंत्र कक्ष, खाटांची व्यवस्था : टोपे

मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनुसार लहान मुलांचे करोनापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी कृतिगटाबरोबरच मुलांवर उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष, खाटांची संख्यावाढ, कृत्रिम श्वसनयंत्रे यांची व्यवस्था करण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लसीकरण नियमात बदल

लशींचा तुटवडा आणि आरोग्य केंद्रांवर होणारा गोंधळ दूर करण्यासाठी सध्याच्या लसीकरणाच्या नियमात बदल करण्याबाबत आरोग्य विभाग विचार करीत आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करताना ३५ वर्षांपुढील, त्यातही सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

राज्यात ५४ हजार नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५४,०२२ जणांना करोना संसर्ग झाला, तर ८९८ रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारच्या तुलनेत शुक्र वारी रुग्णसंख्या घटली आहे. मुंबई ३०३८, ठाणे २२७४, नाशिक शहर १४२३, उर्वरित नाशिक जिल्हा १४००, नगर जिल्हा ३९६९, पुणे शहर २६१०, उर्वरित पुणे जिल्हा ४४१५, पिंपरी-चिंचवड १९७३, सोलापूर २८९९, सातारा १९९३, नागपूर शहर २५२६ आणि उर्वरित नागपूर जिल्ह्यात १९५८ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ लाख ५४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.