मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका; संघाकडून हिंदुत्व नीट शिकून घेण्याचा सल्ला

मुंबई : करोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्रातील मोदी सरकारला रविवारी दिला. हिंदुत्वाचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नीट शिकून घ्या, अशा कानपिचक्याही ठाकरे यांनी भाजपला दसरा मेळाव्यात दिल्या.

गेल्या वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने त्यास महाविजयादशमी मेळावा असे नाव देण्यात आले होते. शिवसेनेचे हिंदुत्वाशी असलेले नाते अधोरेखित करण्यासाठी हा मेळावा वीर सावरकर सभागृहात ठेवण्यात आला. तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, या शब्दांनीच उद्धव ठाकरे यांनी भाषणास सुरुवात के ली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या दसरा मेळाव्यात सकाळी के लेल्या भाषणातील हिंदुत्वाबाबतच्या विधानांचे दाखले देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. हिंदू व हिंदुत्वाबाबत काही लोक संभ्रम पसरवत आहेत. हिंदुत्वाला संकुचित के ले जात आहे, अशा मोहन भागवत यांच्या विविध विधानांचा दाखला ठाकरे यांनी दिला. मंदिर, पुजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले. राजकारण म्हणजे शत्रूशी युद्ध नव्हे, विवेक पाळा हा भागवत यांचा संदेशही समजून घ्या, असेही ठाकरे म्हणाले.

बाबरी मशीद पडली तेव्हा जे बिळात शेपूट घालून बसले होते ते आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत. तुमचे हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारे असेल. पण शिवसेनेचे हिंदुत्व दहशतवाद्यांना बडवणारे आहे, असेही ठाकरे यांनी सुनावले. कं गना राणावतचा मुद्दा, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या यावरून महाराष्ट्राची बदनामी करणारे या मातीशी बेईमानी करणारे असून तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या के ल्यात. आता ते गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, असे ठाकरी भाषेतील फटकारेही उद्धव यांनी लगावले.

देश रसातळाला चालला आहे. देश ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही. आपल्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही अशी इंग्रजांनाही मस्ती होती. पण इंग्रजांचे साम्राज्य मावळले, सूर्य तळपतच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आपलेच सरकार अशी महत्त्वाकांक्षा भाजपची होती. ती संधी भाजपने आपल्या वृत्तीमुळे गमावली. शिवसेनेसह महाराष्ट्रात, विष्णोई यांच्यासह हरयाणात व आता नितीशकुमार यांच्यासह बिहारमध्ये हाच पाठीत वार करण्याचा डाव खेळत आहेत. दहीहंडी फोडताना पाया मजबूत हवा नाही तर पाया ढासळतो आणि वरचा माणूस दोरीला लटकतो. आधी शिवसेना, मग अकाली व आता इतर काही जण रालोआ व भाजपमधून बाहेर पडत आहेत. पाया ढासळत आहे. देश संकटात असताना पाडापाडीचे उद्योग सुरू राहिले तर देशात अराजकाला आमंत्रण मिळेल. त्यातून मग कोणीही चालेल पण तुम्ही नको, असे म्हणून के ंद्रातील भाजपचे सरकार लोक पाडतील. त्यामुळे आधी तुमचे के ंद्रातील सरकार सांभाळा असे ठाकरे यांनी सुनावले. बिहारमधील मतदारांनी छक्केपंजे करणाऱ्यांना मतदान करू नये, असे आवाहनही त्यांनी के ले.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची नवनवीन तारीख जाहीर होत असते. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवा. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभारू, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. मुंबईचा लचका तोडून महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

ठाकरे यांचे फटकारे

– बिहारमध्ये करोनाची मोफत लस देणार असे भाजपचे आश्वासन आहे. बाकीचा देश काय मग बांगलादेश आहे? लाज वाटली पाहिजे देशाची अशारितीने फाळणी के ल्याबद्दल.

– बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना माणसाचे नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. एक बेडुक आणि त्याची दोन पिले तुम्हाला माहिती आहेत. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बेडकाला सांगितले की बाबा वाघासारखा आवाज काढा. बाप आवाज काढतोय पण तो चिरका येतो, अशा शब्दांत ठाकरे यांनी नारायण राणे व त्यांच्या दोन्ही मुलांचा समाचार घेतला.

–  आम्ही शांत आहोत पण षंढ नाही. जर आमच्याशी सभ्यतेने वागाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेने वागू.

– महाराष्ट्राने अनेक उद्योगांशी करार के ले व लवकरच आणखी काही करणार आहे. महाराष्ट्र पुढे चालला म्हणूनच बदनाम करण्याचा हा डाव आहे. आदित्यवर, पोलिसांवर, शिवसेनेवर चिखलफे क के ली व खोटे आरोप के ले. १० तोंडाचा रावण महाराष्ट्रावर चालून आला. एक तोंड म्हणते मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. खरे तर हा पंतप्रधान मोदी यांचा अपमान आहे. कारण देशाचा एक भाग पाकव्याप्त काश्मीर होत असेल तर ते पंतप्रधानांचे अपयश आहे. खायला मुंबईत येतात आणि महाराष्ट्राचे मीठ खाऊन बेईमानी करतात. दुसऱ्या तोंडाने मुंबई पोलीसांना बदनाम करतात आणि बॉलिवूडमध्ये व मुंबईत जणू अफु ची शेतीच चालते असे आरोप करतात. स्वत: शेण खायचे व तोंड दुसऱ्याचे हुंगायचे असे हे महाराष्ट्र द्वेष्टे. भाजपने मित्राशी नाही तरी किमान महाराष्ट्राच्या मातीशी इमान ठेवावे.

– मोहन भागवतांना राष्ट्रपती करा म्हणणारी शिवसेना यांना चालत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी सेक्युलर चेहऱ्याचा मुद्दा काढत भाजपपासून वेगळे झालेले नितीशकु मार यांना चालले. नितीशकु मारांनी यांना सेक्युलर लस दिली की यांनी त्यांना हिंदुत्वाची लस दिली हे पत्र खरडणारे सांगतील का? असा बोचरा सवाल ठाकरे यांनी कोश्यारी यांना उद्देशून के ला.

– राज्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग उभे राहणार आहेत. त्या ठिकाणी कु शल-अकु शल कसलेही रोजगार असोत भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळणार.

– भोवरा व भुईचक्रही फिरते. पण त्याला अर्थ नसतो, अशा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

– लोकांची झुंबड उडू नये म्हणून दसरा मेळावाही आम्ही नियम पाळून करत आहोत. सरसकट प्रार्थनास्थळे-मंदिरे उघडली तर लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. तुमच्यासाठी हिंदू व इतर लोक हे के वळ मतदार असतील. माझ्यासाठी ते कु टुंब आहे. मुख्यमंत्री या नात्याने कु टुंबाचे हित पाहणे माझे काम आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडतील.

– खुर्ची ही भाग्याने मिळते. पण खुर्चीवर बसलो की आपण भाग्यविधाता झालो असा काहींचा समज झाला.

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी २०० कोटी आले..

खासदार या नात्याने दिल्लीत गेल्यावर काहींनी मला सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी २०० कोटी रुपये मुंबईला पाठवले आहेत. याने महाराष्ट्र सरकारच्या के सालाही धक्का लागणार नाही. भविष्यात के वळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेतृत्वही महाराष्ट्रच करणार. ते कोण व कधी करणार हे नंतर कळेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नमूद के ले.

ठाकरे म्हणाले..

’सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संघटनेची काळी टोपी जे घालतात त्या टोपीखाली डोके  असेल आणि त्यात मेंदू असेल तर भागवत यांचे विचार समजून घ्या.

’‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गो-माता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच तुमचे हिंदुत्व आहे का?

’जीएसटीचे हक्काचे पैसे केंद्राकडे मागितले तर रावसाहेब दानवे म्हणाले, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता. दानवे (केंद्रात) बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे (कार्यकर्ते, जनता)आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची गरज नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ.

’अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ या पुढे महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यात  महाविकास आघाडीचेच सरकार राहणार.

‘जीएसटीचा फे रविचार करा’

वस्तू व सेवा कराची यंत्रणा अपयशी ठरली असून त्यात सुधारणा करण्याची किं वा ती व्यवस्थाच रद्द करण्याबाबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी के ले. राज्याला करोनाच्या संकटाबरोबरच अतिवृष्टी-पुराच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना-आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मोठी रक्कम लागणार आहे. पण राज्य सरकारचे जीएसटीचे २८ हजार कोटी आणि इतर करातील हिश्श्याचे १० हजार असे एकू ण ३८ हजार कोटी रुपये के ंद्र सरकारकडे अडकू न पडले आहेत. मग पैसा कु ठून येणार? आधी के ंद्र सरकार राज्य सरकारांनाच कर्ज घ्यायला सांगत होते. आता म्हणत आहे की के ंद्रच पैसा उभारेल. ही वेळ जीएसटीची व्यवस्था अपयशी ठरल्यामुळेच आली आहे, असे ठाकरे म्हणाले.