वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुरुवार २३ जानेवारी रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेना जल्लोष करणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार होणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवेन असे वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने ते पूर्ण झाले आहे. एका मुलाने आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्तता झाली आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी रोजी वचनपूर्ती सोहळा होणार आहे. चित्रपटसृष्टी, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या सोहळ्याला हजर राहतील. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवरून जाहीर केले. मनसे गुरुवारच्या मेळाव्यात हिंदुत्वाचा झेंडा घेणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही हाच संदेश या अयोध्याभेटीच्या घोषणेतून देण्यात आला आहे. सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ व त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ते कधी अयोध्येला जाणार याबाबत अनिश्चितता होती. संजय राऊत यांच्या ट्विटरवरील घोषणेमुळे दौऱ्याची नेमकी तारीख ठरली नसली तरी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत उद्धव ठाकरे अयोध्येला जातील हे स्पष्ट झाले आहे.