News Flash

महाविकास आघाडीच्या सरकारने १६९-० फरकाने जिंकला विश्वासदर्शक ठराव

या प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी फडणवीसांचे आरोपही त्यांनी खोडून काढले.

(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीच्या सरकारचा शनिवारी बहुमत चाचणी पार पडली. यावेळी सरकारला १६९ आमदारांनी आपला पाठींबा दर्शवला. तर ४ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. भाजपाच्या आमदारांनी गोंळध घालत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून काढता पाय घेतला त्यामुळे सरकार विरोधात शून्य मतदान झाले.

शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारात विधानसभेत बहुमत चाचणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी विऱोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप नोंदवले. यामध्ये हे अधिवेशनच बेकायदा असल्याचे ते म्हणाले. तसेच हंगामी अध्यक्ष बदलल्याबद्दल त्यांनी हे देशात पहिल्यांदाच घडले असल्याचा दावा केला. तसेच सभागृहाचे कामकाज नियमांना धरुन होत नसल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत ‘दादागिरी नही चलेगी’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपाच्या आमदारांसह फडणवीस सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहाच्या बाहेर पडले.

दरम्यान, सभागृहात बहुमताची चाचणी पार पडली. यावेळी आवाजी मतदानाने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा दर्शवला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसर, प्रत्येक समर्थक आमदारांची क्रमांक आणि नावासह प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. यामध्ये १६९ आमदारांनी सरकारला पाठींबा दर्शवला. यावेळी माकप, मनसे आणि एमआयएमच्या मिळून चार आमदारांनी सरकारला पाठींबाही दिला नाही आणि विरोधातही मतदान केले नाही, ते तटस्थ राहिले. मात्र, भाजपाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार घातल्याने कोणीही सभागृहात विऱोधात मतदान केले नाही.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हा विश्वासदर्शक ठराव १६९ विरुद्ध ० ने जिंकला. हे संपूर्ण कामकाज हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी फडणवीसांचे आरोपही त्यांनी खोडून काढत संपूर्ण कामकाज हे नियमांनुसारच सुरु असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 4:18 pm

Web Title: chief minister uddhav thackeray led mahavikas aghadi government passes floor test in assembly aau 85
Next Stories
1 “….यापेक्षा मैदानात बरं”, सभागृहात असं का म्हणाले उद्धव ठाकरे ?
2 उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र माणूस – बच्चू कडू
3 उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलं पहिलं भाषण; जनतेचे मानले आभार
Just Now!
X