शपथविधीसाठी विधान भवन परिसरात तयारी सुरू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोमवारी ३० डिसेंबरला शपथविधी होणार असून त्यासाठी विधान भवन परिसरात मंडप उभारणी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात  कोणाकोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेकडून एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळासाठी यादी अंतिम करण्यात काँग्रेसला विलंब होत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ३० डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आला.

मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम सहसा राजभवनवर होत असतो. मागे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम विधान भवन परिसरात झाला होता. आताही सोमवारी ३० हून अधिक मंत्री शपथ घेतील असा कयास आहे. त्यामुळे ३० डिसेंबरच्या शपथविधीसाठी विधान भवन परिसराची निवड करण्यात आली आहे. मोठी जागा आणि निमंत्रितांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे ठिकाण व मंत्रालय-विधिमंडळ या दोन्ही वास्तूंच्या परिसरात असे हे ठिकाण असल्याने विधान भवनची जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार व्यासपीठ उभारण्यासाठी व इतर व्यवस्था निश्चित करण्यासाठी मोजणी व इतर तयारीचे काम गुरुवारी सुरू झाले.

शिवसेनेकडून विधान परिषदेवरील दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारख्या किती ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना संधी मिळणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. तर राष्ट्रवादीमध्ये गृह खाते व उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार याबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूर, वर्षां गायकवाड, प्रणिती शिंदे यांच्यापैकी कोणाकोणाला संधी मिळणार व अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री असूनही नव्या सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होण्याबाबत काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

शपथविधी दोनच्या आत संपवण्याची सूचना नाही ;राजभवनचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा सोमवार ३० डिसेंबर रोजी होणारा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवण्याची सूचना केली नसल्याचे राज्यपालांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठीचा शपथविधी सोहळा दुपारी दोनपर्यंत संपवण्याची तोंडी सूचना राज्य सरकारला करण्यात आल्याबाबतचे वृत्त गुरुवार २६ डिसेंबरच्या लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यात राज्यपालांच्या जनसंपर्क विभागाचे म्हणणेही मांडण्यात आले होते. शपथविधीचा कार्यक्रम दोनच्या आत संपवण्याची कोणतीही तोंडी व लेखी सूचना राज्य सरकारला करण्यात आली नाही, असे राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी स्पष्ट केले आहे.