मुंबई : मेट्रो कारशेडवरून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यास समर्थ आहोत. योग्यवेळी उत्तर देऊ; पण मेट्रो तसेच अन्य विकास प्रकल्पांत मिठाचा खडा टाकू  नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला फटकारले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मेट्रो कारशेडसह अन्य मुद्यांवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले. करोनाशी लढा सुरू असतानाच महाराष्ट्रद्वेष्टय़ांनी राज्याच्या बदनामीचा कट रचला. मात्र, टाळेबंदी शिथिल होताच देश-विदेशातील उद्योगांनी पुन्हा गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पसंती दिली. हे महाराष्ट्राच्या चांगल्या प्रतिमेचे यश असून, पहिल्या टप्प्यात १७ हजार कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोणी कितीही टीका के ली तरी मुंबई आणि राज्याच्या हितासाठी जे करायचे आहे ते करणारच, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले.

करोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते!

जगभरात येत असलेली करोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असून, ती आपल्याकडे आल्यास त्रेधातिरपीट उडेल, असा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले. दिवाळीचा सण प्रदूषण आणि गर्दी टाळून साधेपणाने आणि आनंदाने साजरा करा. सुखसमृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून करोनाला आत येऊ देऊ नका. करोनाची त्सुनामी राज्यात येऊ द्यायची नसेल, तर गफील राहून चालणार नाही. मुखपट्टीचा वापर, हात धुणे आणि अंतर नियम पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ‘माझे कु टुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे राज्यातील करोना नियंत्रित आणण्यात यश आले असून आता बाधितांचा आकडा पुन्हा वाढू द्यायचा नाही. त्यासाठी सर्वानी खबरदारी आणि जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी के ले. मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

रेल्वेबाबत चर्चा सुरू

सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबत रेल्वेशी चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल चांगले सहकार्य करीत असून ते मदत करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त के ला. दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याबाबत नियमावली तयार के ली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.