News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती  

पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी नगरविकासमंत्री व गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.

नागपूर येथून मेट्रोच्या कोचचे आगमन झाले असून या कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी येथे झाले. या मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून एका गाडीतून ९५० ते ९७० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असून तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके असून यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे. ताशी कमाल ९० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून दृकश्राव्य संदेशप्रणाली असणार आहे. हे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

पुणे मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. जून २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या अडिच वर्षांच्या आत हा मार्ग मेट्रोची चाचणी घेण्यासाठी आता सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. सिव्हिल बांधकाम, मार्ग टाकण्याचे काम, विजेच्या तारांचे काम, सिग्नल व अन्य कामे ३० महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते.


									

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 8:25 pm

Web Title: chief minister uddhav thackeray unveils pune metro coach scj 81
Next Stories
1 मुंबईतील साकिनाका परिसरात भीषण आग
2 महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? : फडणवीस
3 ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच, आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला
Just Now!
X