उद्योग-मनोरंजन क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका

मुंबई : राज्यात हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत. आता आपल्याला टाळेबंदीही टाळायची आहे आणि करोनामुळे लोक जायबंदी होणार नाहीत, याचीही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे करोनाविषयक नियमांचे पालन करून- खबरदारी घेऊन उद्योग व मनोरंजन क्षेत्राचे अर्थचक्र सुरू राहावे. करोनाकाळातही उद्योग-व्यवसाय सुरू राहू शकतात, याचे उदाहरण देशासमोर ठेवायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

करोनाच्या टाळेबंदीसदृश निर्बंधांनंतर सोमवार, ७ जूनपासून राज्यात ठिकठिकाणी रुग्णसंख्येनुसार शिथिलीकरण करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंतांच्या दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. ‘लॉकडाऊन’ही (टाळेबंदी) नको आणि करोनामुळे लोक ‘नॉकडाऊन’ (जायबंदी) झाले असेही व्हायला नको. त्यामुळे करोनाचे नियम पाळत राहा. आपण मर्यादित धोका पत्करून निर्बंध शिथिल करत आहोत. त्यासाठी काही निकष ठरवून वर्गवारी केली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे याबाबत निर्णय घेईल, असे सांगत अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.

आता पुन्हा चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, निर्मात्यांनी चित्रीकरणादरम्यान शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. चित्रीकरणासाठी सावधगिरी बाळगायची असून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर चित्रीकरण करता येईल. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना जैव-सुरक्षा परिघातच (बायो-बबल) राहणे बंधनकारक असेल. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सरकार घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन निर्मात्यांना केले. त्यावर सरकार घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन निर्मात्यांनी दिले. के. माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, डॉ. अमोल कोल्हे, सतीश राजवाडे, विजय केंकरे त्याचप्रमाणे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आदी या बैठकीत सहभागी झाले होते.

बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यांतील कामगार काम करीत असतील तर त्यांची आरोग्यविषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना करोनाचा विषाणू पसरवू नये याची काळजी घ्या. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी. पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपले कामगार आणि कर्मचारी आरोग्याचे नियम पाळतील असे पाहा. आरोग्य तपासण्या कराव्यात. बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून रोग पसरणार नाही हे पाहा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी के ल्या. प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक, संजीव बजाज, बी. थियागराजन, डॉ. नौशाद फोब्र्ज, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए. एन. सुब्रमनियन, डॉ. अनिश शहा, अजय पिरामल, बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथूर, उज्ज्वल माथूर, संजीव सिंग, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया आदी उद्योग क्षेत्रातील नामवंत या बैठकीत सहभागी झाले होते.

आगामी काळात करोनाची तिसरी लाट आली आणि टाळेबंदीसदृश निर्बंध लावले तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होऊ नये अशा रीतीने व्यवस्था के ली पाहिजे. उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असे आवाहनही ठाकरे यांनी के ले.

उद्योजकांचे म्हणणे..

’संभाव्य तिसऱ्या लाटेत आर्थिक व्यवहार बंद होऊ नयेत.

’उद्योग व कारखान्यांत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण, चाचणी याबाबत वर्गीकरण करावे.

’ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील. उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटित वर्गाच्या लसीकरणावर भर.

’रस्त्यांवर तपासणीसाठी पोलीस उभारत असलेल्या अडथळ्यांमुळे वाहतूक संथ होते व गर्दी होते. याबाबत फे रविचार करावा.