पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सचिवांना इशारा

मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा मला हिशेब हवा आहे.  त्याचप्रमाणे उलटय़ा -सुलटय़ा, सरकारवर भ्रष्टाचाराच्या संशयाचे शिंतोडे उडविणाऱ्या नस्ती आपल्याकडे पाठवू नका, किंबहुना अशा नस्ती तयारच होणार नाहीत याची खबरदारी घ्या. यात कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी प्रशासनाला इशारा दिला.

मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांच्या सचिवांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. जनतेने दिलेल्या करातून विकास कामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वाची जबाबदारी आहे. जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकास कामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. लोकांशी नम्रपणे वागा. शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वागीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची असून छोटय़ा-छोटय़ा कामांसाठी लोकांना मंत्रालयापर्यंत यावेच लागू नये याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात जंगी स्वागत

हुतात्मा चौकातील स्मारकास अभिवादन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येताच टाळ्या आणि घोषणांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गुरुवारी त्यांच्या समवेत शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. मुख्यमंत्र्याचे आगमन होताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून ठाकरे यांचे स्वागत केले.

या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे व त्यांचे मावस बंधू वरूण सरदेसाई, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.