12 November 2019

News Flash

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी मनोमीलनाची रणनीती

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन बुधवारी, १९ जून रोजी होत असून यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची शिवसेनेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.

२०१४ चा अनुभव लक्षात घेऊन लोकसभेच्या यशानंतर भाजप पुन्हा जागावाटपासारखे काही निमित्त करून युती तोडेल अशी शंका शिवसैनिकांच्या मनात असल्याने फडणवीस यांच्याकडूनच युतीच्या आणाभाका व मनोमीलनाचे धडे वदवून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पाच वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे प्रमुख भाषण होईल. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम होत आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागावाटपातील मतभेदाचे निमित्त साधत भाजपने विधानसभेवेळी युती तोडली. त्यामुळे बेसावध शिवसेनेची धांदल उडाली होती. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती झाली व महाराष्ट्रातून ४१ जागांवर घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा काही गडबड करणार तर नाही अशी चर्चा सुरू असते.  या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्याची खेळी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते आमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यातील सर्वोच्च नेत्याकडूनच युतीच्या आणाभाका वदवून घेण्याचे आणि भाजप कार्यकर्ते-शिवसैनिकांच्या मनोमीलनाचे धडे देण्याचे काम परस्पर होणार असून युतीबाबतच्या शंकांना पूर्णविराम देण्याचा उद्धव यांचा हा प्रयत्न आहे.

First Published on June 19, 2019 12:49 am

Web Title: chief ministers guidance on the anniversary of shivsena