नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानाची आढावा घेतला, यावेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

विदर्भात झालेल्या गारपिटीमध्ये संत्रे, धान, गहू, हरभरा, भाजीपाला, केळी, मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे नुकसान झाले होते. त्याचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. या नैसर्गिक आपत्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मदत जाहीर केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे जे तालुके यातून सुटले होते असे सांगण्यात आले होते त्या तालुक्यांतील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नागपूर भागातील फळबागांवर झालेल्या गारपिटीमुळे दोन बहरांना नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई करताना याचा विचार व्हावा, असे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत मागणी केली. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बोंडअळीने बाधित आहे त्या क्षेत्रात सरसकट भरपाई द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.

विदर्भात ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमध्ये हाताशी आलेले पीक हिरावून नेले. सुमारे दोन ते तीन लाख हेक्टरवरील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. गारपीटीचा रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या गहू, हरभरा, तूर आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे. अकोला, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये पीक हानी अधिक आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ात गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पाऊस पिकांसाठी बाधित ठरल्याने त्याची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.