ठाणे येथील तीनहात नाका ते नितीन जंक्शनपर्यंत महापालिकेने तयार केलेल्या हरित जनपथ, कोपरी येथील ११० दशलक्ष लिटर मलप्रक्रिया केंद्र आणि नागरी संशोधन केंद्राला मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांनी भेट दिली. हरित जनपथाची पाहणी करताना भारावून गेलेल्या बांठीया यांनी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि त्यांच्या चमूची स्तुती केली. तसेच महापालिकेने शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाचा आदर्श इतर शहरांनी घ्यावा, असे कौतुकोद्गारही त्यांनी या वेळी काढले.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित  कार्यशाळेचे उद्घाटन बांठीया यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मालिनी शंकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव मोपलवार, आयुक्त राजीव उपस्थित होते.