महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदीवरून आरोपांची राळ उडविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच चिक्कीचा दरकरार नारायण राणे यांच्या उद्योग मंत्रालयाने तयार केला असून २०१३-१४ मध्ये काँग्रेसच्या काळात ३० कोटी २२ लाख रुपयांची चिक्की दरकरारावर ‘सूर्यकांता’ संस्थेकडूनच करण्यात आली होती. याशिवाय अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्हा परिषद, नंदूरबार, कोल्हापूर आणि पुणे या जिल्हा परिषदांनी यंदाच्या वर्षी याच संस्थेकडून दोन कोटी १९ लाख रुपयांची चिक्की खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
तीन लाखांवरील खरेदी ही निविदेद्वारे करावी असे शासन आदेश असताना पंकजा मुंडे यांनी दरकरारावर खरेदी केल्यामुळे घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित संस्थेची फॅक्टरी नसल्याचे आरोप केले जात आहेत. सूर्यकांता संस्थेचा चिक्कीसाठीचा दरक रार राणे उद्योगमंत्री असताना करण्यात आला आहे. या संस्थेकडे चिक्की बनविणारी व्यवस्थाच नव्हती तर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांनी याच संस्थेकडून चिक्की कशी घेतली व ती कोठे गेली असा सवालही या विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला. महत्त्वाचो म्हणजे निर्णय सर्वानाच लागू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदांनी तीन लाखांवरील चिक्की खरेदी करताना निविदा का काढल्या नाहीत व दरकरारावर खरेदी कशी केली असा सवालही या अधिकाऱ्याने केला.
काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषदा आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेनेही तीन लाखांवरील खरेदी शासनाच्याच दरकरारानुसार खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदाच्या वर्षीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदा सूर्यकांता संस्थेकडून कोटींची चिक्की खरेदी करत असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनच निविदा का काढण्यात आल्या नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 28, 2015 4:33 am