13 October 2019

News Flash

मूल विक्री टोळीकडून बालकांचे अपहरण?

सुटका केलेल्या दोन बालकांच्या पालकांचा पत्ता नाही

(संग्रहित छायाचित्र)

दत्तक घेण्याच्या बहाण्याने गरीब, गरजू मातांकडून त्यांची मुले ताब्यात घेऊन ती विकणाऱ्या टोळीने काही बालकांचे अपहरण केले असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे. या कारवाईत मुंबई आणि दिल्लीतून सुटका करण्यात आलेल्या दोन बालकांच्या पालकांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळेच तपासकर्त्यांना मूल चोरी, अपहरणाबाबत संशय बळावल्याचे समजते. गुन्हे शाखेच्या चेंबूर कक्षाने पाच महिलांची टोळी गजांआड केली.

गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेने या टोळीला बेडय़ा ठोकत चौकशी सुरू केली. तेव्हा दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत या टोळीने मुंबईत दोन तर दिल्ली येथे दोन बालके(चारही मुलगे) विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने या चारही बालकांची सुटका करून ती विकत घेणाऱ्या पाच जणांना अटक केली. सुटका केलेल्या दोन बालकांच्या पालकांचा विशेषत: मातांबाबत टोळीने चटकन पुढे केली. पथकाने या मातांकडे चौकशी करून खातरजमाही केली. मात्र उर्वरित दोन बालकांच्या पालकांबाबत टोळी तपास पथकाला तुटक माहिती दिली. त्याआधारे पालकांचा शोध घेण्यासाठी बरीच धडपड पथकाने केली. मात्र अद्याप पालकांचा शोध लागलेला नाही.

आरोपींच्या देहबोलीवरून त्या या बालकांच्या पालकांबाबत खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देत असाव्यात. त्यावरून त्यांनी विक्रीसाठी बालकांचे अपहरण केले असावे किंवा ही बालके रुग्णालयांमधून चोरली असावीत, असा संशय आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत शहरात रुग्णालयातून चोरी झालेल्या किंवा अपहृत झालेल्या बालकांची, त्या प्रकरणांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सुटका केलेली चारही बालके सध्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहेत. चारही बालकांचे आणि ओळख पटलेल्या पालकांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. न्याय वैद्यक प्रयोगशाळेत ते जुळवून पाहिले जात आहेत. ते जुळले तरी ओळख पटलेल्या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात द्यावे का? हा निर्णय बाल कल्याण समिती घेणार आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मुलगाच हवा, या मानसिकतेतून बालकांची खरेदी

मूल होत नाही म्हणून नव्हे तर मुलगाच हवा म्हणून मुंबई, दिल्लीतल्या पालकांनी या टोळीकडून बालकांची खरेदी केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाले आहे. बालकांच्या अवैध खरेदीप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी तीन मुली आहेत, दुसऱ्याला १७ वर्षांची मुलगी आहे. विकत घेतलेली चारही बालके मुलगेच आहेत. त्यावरून मुलगाच हवा, ही मानसिकता आणि त्यासाठी हवा तेवढा खर्च करण्याची तयारी ही मानसिकता दिसून येते, असे गुन्हे शाखेचे अधिकारी सांगतात.

मुंबई ते दिल्ली संपर्काची उकल

टोळीतील प्रत्येक महिला आरोपी या ना त्या कारणाने प्रसुती, मूल न होणे किंवा त्यावरील उपायांशी निगडीत आहे. यापैकी एक सरोगेट मदर होती. एक सरोगसी करणाऱ्या संस्थेत समन्वयक होती. एक महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील प्रसुती विभागाबाहेर सुरक्षारक्षक होती. तर सर्वच आरोपी महिला ‘एग डोनर’ही होत्या. याच माध्यमातून या सर्व महिला एकत्र आल्या. मूल न होणाऱ्या किंवा त्यासाठी सरोगसी, आयव्हीएफ असे उपाय सुचविलेल्या महिलांना त्या मूल विक्रीसाठी हेरत होत्या. तर पालिकेच्या प्रसुती केंद्रांमध्ये प्रसूत झालेल्या गरीब, गरजू महिलांना हेरून त्यांच्याकडून मूल ‘दत्तक’ घेण्यासाठी प्रयत्न करायच्या. याच साखळीतून आरोपी भाग्यश्री कोळी आणि दिल्लीतील नेहा गुप्ता यांची ओळख झाली. नेहाने एकदा मध्यस्थामार्फत भावासाठी तर दुसऱ्यांदा थेट दिरासाठी भाग्यश्रीकडून मूल खरेदी केले.

First Published on July 12, 2019 1:34 am

Web Title: child abduction from the child sales gang abn 97