चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयात लसीकरणानंतर एका अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा संशय पालकांकडून व्यक्त होत आहे. रुग्णालयाने मात्र लसीकरणानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप धुडकावून लावला आहे. परिणामी मृत्यूमागचे कारण शोधण्याकरिता या बालकाचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.
या बालकाला शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास रुग्णालयात ‘एचआयबी’ ही लस टोचण्यात आली होती. साधारणपणे या वयात ही लस मुलांना टोचली जाते. परंतु, हा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. लशीमुळेच या मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. लस टोचल्यानंतर मुलाला लगेचच काही झाले नव्हते ही बाब पालकांनाही मान्य आहे. मात्र, सकाळी या बालकाचे शरीर निस्तेज जाणवले. तसेच तो काहीच हालचाल करीत नसल्याने पालकांनी त्याला पुन्हा त्याच रुग्णालयात तपासणीकरिता आणले. त्या वेळी त्याला मृत घोषित करण्यात आले. आता या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे, असा आरोप बालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी रुग्णालयाविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलाचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.