कामगार विभागाच्या लेखी केवळ ५५ बालकामगार

मुंबई : करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका अल्पवयीन मुलांनाही बसला आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार बुडाल्याने आणि वर्षभरापासून शाळा बंद असल्याने अनेकजण बालमजुरीकडे ढकलली गेली आहेत. गेल्या वर्षभरात वीट भट्टी, ऊस तोडणी, घरकाम अशा ठिकाणी शालेय शिक्षण घेणारी मुले काम करताना आढळू लागल्याचे सामाजिक संस्थांच्या पाहणीत समोर आले आहे. मात्र कामगार विभागाच्या दरबारी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात केवळ ५५ बालकामगारांची नोंद झाली आहे.

आश्रम शाळा, वसतिगृहात राहून शिकणारी मुले सध्या घरीच आहेत. दुर्गम भागात आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल फोन तसेच इंटरनेट सुविधेअभावी मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून तुटली आहेत. त्यातच कु टुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी मुले बालमजुरीकडे ढकलली जात आहेत.

‘विनीत (नाव बदलून) हा नववी इयत्तेत शिकणारा मुलगा टाळेबंदीमध्ये वीटभट्टी कामगार झाला. त्याचे वडील वीटभट्टीवर, तर आई मोलमजुरीचे काम करते. टाळेबंदीत दोघांचे काम सुटले. ऑनलाइन शिक्षणाची सोय नसल्यामुळे विनीत शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडला होता. त्यामुळे पुन्हा काम सुरू होताच कु टुंबीयांना आर्थिक मदतीसाठी विनीतही वीटभट्टीवर कामाला जाऊ लागला,’ अशी माहिती वंचित विकास संस्था खंडाळाचे सचिव राजेंद्र काळे यांनी दिली.

‘सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे अनेक मुले गाड्या धुणे, कचरा गोळा करायला, भंगार गोळा करायला जाताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे,’ असे बालहक्क कृती समिती पुणेचे मंदार शिंदे यांनी सांगितले.

शिकणाऱ्या मुली घरकामाला

सरकारच्या बालकामगारांच्या व्याख्येनुसार १४ आतील मुले ही बालकामगार म्हणून गणली जातात. तर १४ ते १८ वयोगटातील आणि धोकादायक उद्योग व्यवसायात काम करणारी मुले बालकामगार समजली जातात. मात्र कारोनाकाळात अनेक १४ ते १८ वयोगटातील मुले मजुरीकडे वळली आहेत. ‘मुंबईत वांद्रे परिसरात शिक्षण घेणारी १० वर्षीय मुलगी तीन चार घरात घरकाम करू लागली आहे. या मुलीच्या आईचा रोजगार बुडाला आहे. या दोघी मायलेकी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागल्या आहेत,’ असे क्राय संस्थेशी संलग्न असलेल्या हॅबिटाट अँड लाईवलीहूड वेल्फे अर असोसिएशनच्या प्रमुख श्वोता दामले यांनी सांगितले.

संस्थेचे सर्वेक्षण

संकल्प मानव विकास संस्था परभणीने केलेल्या पाहणीत ऊस तोडणी, वीटभट्टी, शेतात आणि घरकामाला बाल मजुरांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. संस्थेला जालना जिल्ह्यात १४ वर्षांखालील ७४२ बालमजूर आढळून आले. त्यातील १६२ मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यात आले. परभणी जिल्ह्यात १४ वर्षांखालील ५७९ बालमजूर आढळून आले. यातील १२९ मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यात आले, असे संकल्प मानव विकास संस्थेचे सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले. तर १० ते १८ वयोगटामधील बालमजूर अहमदनगर जिल्ह्यात ७९, पुणे २७, औरंगाबाद ४२ आढळून आल्याची माहिती क्राय या संस्थेने दिली. कलापंढरी संस्थेने केलेल्या पाहणीत लातूर आणि नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत बालमजुरांची ४६९ प्रकरणे समोर आली आहेत. यातील२५९ मुले शेतीच्या, तर ऊसतोड मजुरीच्या कामात ६६ मुले आढळून आली आहेत. दरम्यान संस्थेने केलेल्या पाहणीत ऊसतोडणी करताना आढळलेल्या मुलांमध्ये ६० मुली आहेत.

 कारवाई नगण्य

कामगार विभागाकडून एप्रिल २० ते मार्च २१ या वर्षात १४ वर्षांच्या आतील २१ बालकामगार आणि १४ ते १८ मधील धोकदायक उद्योगात काम करणारे ३४ बालकामगार सापडले. तर बालमजुरी केल्याप्रकरणी २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.