News Flash

मुंबई, पुण्यात दमाग्रस्त बालकांमध्ये वाढ

धोकादायक हवेचा परिणाम; ‘लॅन्सेट’च्या अहवालातील माहिती

(संग्रहित छायाचित्र)

धोकादायक हवेचा परिणाम; ‘लॅन्सेट’च्या अहवालातील माहिती

शैलजा तिवले, मुंबई

हवेतील नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण धोकादायक बनले असून त्यामुळे  मुंबई आणि पुणे शहरांतील बालदम्याचे रुग्ण वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘लॅन्सेट’ नियतकालिकात  म्हटले आहे.

मुंबई, पुण्यासह जगभरातील १२५ शहरांच्या हवेतील नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण, लोकसंख्या आणि बालदम्याचे रुग्ण यांचे परीक्षण या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले.  हवेतील वाढलेले प्रदूषण हे  बालदमा वाढण्यासाठी धोकादायक ठरू शकते, हा इशारा त्यात देण्यात आला आहे.

शहरांमधील वाढत चाललेले नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि बालदमा यांच्या परस्परसंबंध या अभ्यासाद्वारे समोर आला आहे. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे दूषित होणारी हवा बालकांमधील दमा वाढविण्यास कारणीभूत असल्याचे याआधी संशोधनातून मांडले गेले आहे.

जगभरात सर्वात जास्त बालदम्याचे रुग्ण पेरू देशातील लिमा शहरात आहेत. चीनमधील शांघाय येथे दरवर्षी दर एक लाख बालकांमागे ६०० हून अधिक बालदम्याच्या नव्या रुग्णांची भर पडते आहे.

हवेतील वाढणाऱ्या नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी केल्याने भविष्यातील बालदम्याच्या रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे. विशेषत: शहरांमध्ये याबाबत धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहेत, असे या अभ्यासात सूचित करण्यात आले आहे.

धक्कादायक..

खेडय़ांच्या तुलनेत शहरांमध्ये नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या बालदम्याचे प्रमाण शहरांमध्ये ६४ टक्के आहे. मुंबई आणि पुणे शहरात दरवर्षी एक लाख बालकांमागे दीडशेहून अधिक नव्याने बालदम्याच्या रुग्णांची भर पडत आहे.

मुंबईमध्ये बालदमा आणि दम्याशी निगडित अन्य आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दशकभरात  वाढली आहे.  शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरत गेल्याने बहुतांश रुग्णांना दम्याचा त्रास होत असल्याचे दिसून येते. बालदम्याला प्रतिबंध करणे शक्य नाही. परंतु झाल्यानंतर त्यावर नियंत्रित ठेवणे मात्र शक्य आहे.

– डॉ. मुकेश अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ, केईएम रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 5:08 am

Web Title: childhood asthma rise in mumbai and pune
Next Stories
1 माजी प्राचार्य, लेखक डॉ. विजय देव यांचे निधन
2 धरणांमधील कमी साठय़ामुळे पाणी संकटाचे चित्र स्पष्ट
3 पथनाटय़ कलाकारांची दररोज हजार रुपयांची बेगमी
Just Now!
X