एका महिन्यात संख्या दुप्पट; आतापर्यंत ९ बालकांचा मृत्यू

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील एकूण करोनाबाधितांच्या संख्येत जसजशी वाढ होत आहे, तसे लहान मुले बाधित होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या महिन्याभरात १० वर्षांखालील बालकांमधील संसर्गाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. १० जून रोजी ८८५ बालके बाधित झाली होती तर १२ जुलैपर्यंत १६२९ बालकांना करोना झाला आहे. आतापर्यंत ९ बालकांचा करोनाने बळी घेतला आहे.

मुंबईत आतापर्यंत करोनाचे एकूण ९३ हजार बाधित रुग्ण आहेत. त्या तुलनेत लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असले तरी त्यातही वाढ होत आहे. घरातली मोठी माणसे बाधित झाली की संसर्ग लहान मुलांनाही होतो. त्यामुळे गेल्या महिन्याभरात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

मुंबईत ० ते १० वर्षे वयोगटातील आतापर्यंत १६२९ बालके करोनाबाधित झाली आहेत. त्यापैकी ५४ टक्के मुलगे आहेत तर ४६ टक्के मुली आहेत. तर १० ते २० वर्षे वयोगटातील २९७४ मुले बाधित झाले आहेत. मोठय़ांच्या तुलनेने लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे मुले पटकन बरी होतात, असा डॉक्टरांचा अनुभव आहे. तसेच लहान मुलांमध्ये हृदयरोग, मधुमेह असे वयाबरोबर येणारे अन्य

आजार नसतात. त्यामुळे त्यांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र आता संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे लहान मुलांमध्येही या आजाराचा फैलाव होऊ लागला आहे.

लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाला की त्यांना ताप, सर्दी, खोकला, कधीकधी न्युमोनिया अशी लक्षणे दिसतात. पण त्यांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, असे नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितले.

सर्वसाधारण वयोगटातील रुग्णांपेक्षा बालकांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र काही बालकांना जन्मत: काही शारीरिक दोष असतील तर अशी बालके दगावतात, असे आढळून आले आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

करोनाबाधित बालके

वय                            १० जूनपर्यंत          १२ जुलैपर्यंत

बाधित  मृत्यू            बाधित     मृत्यू

० ते १० वर्षे               ८८५    २                    १६२९      ९

१० ते २० वर्षे            १६५७    ४                      २९७४   १८