महापालिका स्तरावर बालरोगतज्ज्ञांचा कृतिगट

मुंबई : करोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त के ली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील बालकांच्या विभागातील २० टक्के खाटा करोनाबाधित बालकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच नवजात बालकांसाठी १०० कृत्रिम श्वसनयंत्रणा पालिकेकडून खरेदी करण्यात येणार आहेत.

करोनाबाधित बालकांच्या दृष्टीने रुग्णालयातील पूर्वतयारी, उपचार, उपाययोजना करण्यासाठी पालिका रुग्णालय स्तरावरही कृतिगट तयार करण्यात आला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा गट कार्यरत असणार आहे. यात पालिका रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांचा समावेश आहे.

प्रौढांचे लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये १८ वर्षांखालील बालकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. यातील सुमारे पाच टक्के बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळेच पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक, नायर, कूपर यांसह उपनगरातील वांद्रे येथील भाभा, कुर्ला येथील भाभा, शताब्दी इत्यादी रुग्णालयांमध्ये बालकासांठी असलेल्या खाटांपैकी २० टक्के खाटा करोनाबाधित बालकांसाठी राखीव ठेवल्या जातील, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

बालकांवरील करोना उपचाराची नियमावली तयार केली जात असून ती सर्व डॉक्टरांना दिली जाईल. या अनुषंगाने त्यांचे प्रशिक्षणही घेतले जाणार आहे. करोनाबाधित बालकांचे विभाग कसे असावेत याविषयी मार्गदर्शनही या गटाकडून रुग्णालयांना केले जाणार आहे. जम्बो रुग्णालयांमध्येही बालकांचे विभाग उभारण्यात येणार आहेत. त्यांना देखील गटाकडून मार्गदर्शन केले जाईल. पालिका स्तरावर हा कृतिगट कार्यरत असेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

नवजात बालकांसाठी २३३ कृत्रिम श्वसनयंत्रणा

करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या रुग्णालयात नवजात बालकांसाठी ३३ कृत्रिम श्वसनयंत्रणा नवीन खरेदी करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक उत्तदायित्वातून १०० यंत्रणा पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. अशा १३३ यंत्रणा सध्या पालिकेकडे उपलब्ध असून या व्यतिरिक्त आणखी १०० यंत्रणा खरेदीच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण २३३ यंत्रणा नवजात बालकांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे काकाणी यांनी सांगितले.