आर्थिक मदतीसह शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यास अनेक दानशूर पुढे

चेंबूरमधील शारदा घोडेस्वार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अल्पवयीन मुलांनी कर्ज काढून आईचे अंत्यसंस्कार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील दानशूरांचे अनेक हात या चिमुकल्यांच्या मदतीला धावून आले आहेत. यातील अनेकांनी या मुलांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे.

‘आईच्या अंत्यविधीसाठी १५ हजारांचे कर्ज’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता मुंबई’ने १५ डिसेंबरच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध केले होते. चेंबूरच्या पांजरापोळ येथे राहणाऱ्या शारदा यांच्या अंगावर झाड पडून त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलांकडे पैसेही नव्हते. घरकाम करणाऱ्या शारदा यांच्या खांद्यावरच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूनंतर मुलांसमोर जगण्याचाच प्रश्न उभा ठाकला आहे. मुलांनी आईच्या अंत्यविधीकरिता १५ हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. शिवाय त्यांच्या घरात त्यांची आईच एकमेव कमावती असल्याने तिच्या मृत्यूनंतर आमचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न मुलांसमोर उभा राहिला होता. ‘लोकसत्ता’त मुलांची ही व्यथा प्रसिद्ध होताच तात्काळ या मुलांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला.

शुक्रवारी सकाळीच गोवंडी पोलीस ठाण्यातील काही अधिकारी या मुलांच्या घरी पोहोचले. गोवंडी पोलीस ठाण्यातील ८० ते ९० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून १७ हजारांची तातडीची मदत या मुलांना दिली आहे. यापुढेही या मुलांना आमच्या परीने मदत करीत राहू, असे आश्वासन गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिले आहे. त्यानंतर दिवसभर या मुलांना मदत करण्यासाठी शहरातील विविध भागांतून अनेक दानशूर वाचकाचे दूरध्वनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात खणखणत होते. अनेकांनी या मुलांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

राजकारण्यांची मदत

सायंकाळी पाचच्या सुमारास वरळीतील आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, समृद्धी काते यांनीही या मुलांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार असल्याचे या वेळी शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर पुढील महापालिका नोकरभरतीमध्ये शारदा यांचा मोठा मुलगा सुमित यास पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन या वेळी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिले.