राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडे कोटय़वधी रुपयांची आर्थिक तरतूद असताना राज्यातील बालसुधारगृहांची अवस्था अतिशय भयावह असून या सुधारगृहांमध्ये रवानगी करण्यापेक्षा ती मुले गुन्हेगाराच्या तावडीत असलेली परवडतील, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या विभागाच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी सडकून टीका केली. लहान मुलांना कामावर ठेवणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या मालकांच्या पाठीत दंडुके हाणा आणि ठाणे शहराला बाल अत्याचारमुक्त शहर अशी नवी ओळख निर्माण करून द्या, असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.
ठाणे पोलिसांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या बाल सुरक्षा विभागाचा आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विभागात ५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालकांवर होणारे अत्याचार, अपहरण यांसारख्या गुन्ह्य़ांच्या तपासासाठी आणि सुटका झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने हा विभाग काम करणार आहे. या कार्यक्रमास राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, पोलीस आयुक्त विजय कांबळे, ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेच्या फरिदा लांबे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना पाटील यांनी बालकांची सुरक्षा ही राज्य पोलिसांसाठी प्राधान्यक्रमावर असेल, असा दावा करताना एकटय़ा मुंबई शहरातून ४९ हजार बाल कामगारांची यापूर्वीच सुटका करण्यात आल्याचे सांगितले.