मुंबई : बालदिनानिमित्त शिक्षण विभागाने मुलांसाठी ऑनलाइन स्पर्धाचे आयोजिन केले आहे. यंदा ऐन दिवाळीच्या दिवशी येणाऱ्या बालदिनी ई-साहित्य संमेलन घेण्यात येणार असून शिक्षक आणि पालकांना मुलांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड करायचे आहेत. मात्र त्यामुळे शिक्षकांच्या दिवाळीवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

गेली काही वर्षे शाळांमध्ये मागे पडलेला बालदिन सरकार बदलल्यानंतर यंदा पुन्हा साजरा करण्यात येणार आहे. आठवडाभर म्हणजे ८ नोव्हेंबरपासून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित विषयांवरील विविध स्पर्धाचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे.

प्रत्येक इयत्तेनुसार विभागाने दिलेला उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर करायचा आहे आणि त्याची चित्रफीत, छायाचित्र पालक, शिक्षकांनी समाजमाध्यमावर ठरवून दिलेल्या दिवशी अपलोड करायचे आहे. ऑनलाइन साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहाची सांगता १४ नोव्हेंबरला, बालदिनी होणार आहे. या दिवशी बालसाहित्य ई-संमेलन घेण्याची सूचना विभागाने दिली आहे.

मात्र, यंदा १४ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आहे. मुळात दिवाळीच्या दीर्घ सुट्टीबाबत संदिग्धता असलेल्या शिक्षकांना दिवाळीच्या दिवशीही काम करावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या उपक्रमांचे स्वरूप हे स्पर्धात्मक आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांचे तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर परीक्षण करून त्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशीही ‘उपक्रम राबवा, अहवाल पाठवा’ अभियानच शिक्षकांना राबवावे लागण्याची शक्यता आहे.