बांधकाम व्यावसायिक, देखभाल कंपनीसह सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा

कांदिवलीच्या महावीरनगर येथील वीणा संतूर एस २ इमारतीत बुधवारी सकाळी वाहन उद्वाहन कोसळून बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, उद्वाहनाच्या देखभालीसाठी नेमलेली कंपनी आणि इमारतीच्या सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला. यापैकी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच ही इमारत उभी राहिली. अलीकडेच इमारतीच्या वाहनतळावर दुमजली वाहनतळ व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी वाहन उद्वाहन यंत्रणा उभारण्यातआली. बुधवारी सकाळी इमारतीतील लहान मुले खेळता खेळता वाहनतळावर आली. तेव्हा एक गाडी  उद्वाहनातून वरच्या मजल्यावर जात होती. त्याभोवतीच लहान मुलांनी फेर धरला. तेव्हाच उद्वाहन गाडीसकट खाली कोसळले आणि त्याखाली निहाल वासवानी (वय ७)हा मुलगा चिरडला. निहालचे वडील संदीप आणि अन्य दहा जणांनी गाडी बाजूला करून उद्वाहन वर करून जखमी निहालला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच निहालचा मृत्यू झाला होता.

कांदिवली पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली. इमारतीतील रहिवाशांची गृहनिर्माण सहकारी संस्था अस्तित्वात आली नसल्याने देखभाल, डागडुजीची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची आहे, ही बाब समोर आली. उद्वाहन यंत्रणा सदोष असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी देखभालीसाठी नेमलेल्या कंपनीकडे केल्या होत्या. आदल्या दिवशीही अशी एक तक्रार कंपनीकडे करण्यात आली होती, असे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला. अपघात घडला तेव्हा सुरक्षारक्षक आदर्श मिश्रा वाहनतळावरच उपस्थित होता. त्याने मुलांना वाहनतळाबाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे या गुन्हय़ात त्याला अटक केल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पोंडकुळे यांनी सांगितले.