पाऊस, गारपीट, कडाक्याचे ऊन यांचा अनुभव एकाच आठवडय़ाभरात घेतल्यावर गेले दोन दिवस मुंबई व परिसरात सुखद गार वारे वाहू लागले आहेत. पूर्वेकडून येणारे उबदार वारे क्षीण झाल्यामुळे तापमानात घट झाली असली तरी हा परिणाम लवकरच कमी होणार असून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सध्या वायव्येकडून मुंबई व राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवात विरोधी स्थितीमुळे उबदार वाऱ्यांचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे काही भागांत गारपीटही झाली. आता ही चक्रीवात स्थिती निवळली आहे. त्यामुळे उबदार वाऱ्यांचा वेगही ओसरला असून वायव्येकडील थंड वाऱ्यांना विरोध नसल्याने हवा अधिक थंड झाली आहे. यामुळे गुरुवारी, १२ मार्च रोजी ३८.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला दुपारच्या कमाल तापमानाचा पारा सोमवार-मंगळवारी ३० अंश से.वर घसरला. संध्याकाळी घरी परतत असलेल्या लाखो प्रवाशांनाही पुन्हा एकदा गारव्याचा अनुभव आला. मात्र रात्री उशिरा पुन्हा जमिनीवरून उबदार वारे येऊ लागल्याने पहाटेच्या तापमानात जास्त घट झाली नाही. मंगळवारी सांताक्रूझ येथे १८.४ अंश से. तर कुलाबा येथे २२.८ अंश से. तापमानाची नोंद झाली.
पावसाच्या शिडकाव्यानंतर उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी ही सुखद वाऱ्याची झुळूक कितीही हवीहवीशी वाटली तरी आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे हा तात्पुरता परिणाम ओसरून तापमापकातील पारा पुन्हा उध्र्व गतीने सरकू लागेल. पुढील दोन दिवसांत कमाल व किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या स्थित्यंतराच्या काळात वाऱ्यांची दिशा व त्यांचा जोर निश्चित नसतो व त्यामुळे कडाक्याचे ऊन, पाऊस तसेच गारवा अशा सर्व प्रकारच्या हवामानाचा अनुभव मार्च महिन्यात येतो.