देशी अगरबत्ती व्यवसायावर चीन आणि व्हिएतनाममधून आयात होणाऱ्या कच्च्या मालाचे आक्रमण झाले आहेच; त्याचबरोबर अगरबत्ती तयार करण्यासाठी यंत्रांचा वापर सुरू झाल्याने त्याचा परिणाम हाताने उदबत्त्या वळण्यावर झाला आहे. एका यंत्रामागे सुमारे १० कामगारांवर बेकार होण्याची वेळ आली आहे.
राज्यात पंढरपूर येथे अगरबत्ती तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. त्याशिवाय पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, गडिहग्लज आदी ठिकाणीही अगरबत्ती तयार करणारे लहान-मोठे व्यावसायिक आहेत. काही वर्षांपूर्वी येथील उद्योजक मंडळी बंगळुरू, चेन्नई येथून अगरबत्ती तयार करण्यासाठी बांबूच्या काडय़ा, कोळसा पावडर, जिलेट, चंदन पावडर, चंदन तेल आदी कच्चा माल आणत असत. मात्र बांबू, अगरबत्तीत वापरण्यात येणाऱ्या सुगंधी वनस्पतींची तोड, चंदनाच्या झाडांच्या तोडीवरील र्निबध आणि जोडीला या कच्च्या मालाच्या किमतीतील दरवाढीमुळे हा व्यवसाय संकटात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून चीन आणि व्हिएतनाम येथून अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल स्वस्तात उपलब्ध होत आहे. बांबूच्या काडय़ांना कोळसा किंवा तत्सम पावडर लावलेल्या स्थितीत हा कच्चा माल येतो. आपल्याकडे या तयार काडय़ा विविध सुगंधांमध्ये बुडविल्या जातात आणि आकर्षक पॅकिंग करून त्यांची विक्री केली जाते. हे काम अधिक सोपे झाल्याने भारतात अगरबत्त्या निर्मितीचे प्रमाण कमी होत चालले आहे.
याचा फटका कामगार वर्गाला बसत आहे. आतापर्यंत अगरबत्त्या तयार करण्याचे काम अल्पशिक्षित, विशेषत: महिला कामगार मोठय़ा प्रमाणावर करत असत. मात्र आता हेच काम यंत्रावर सुरू झाले आहे. ६ बाय ६ फूट आकाराचे हे यंत्र एखाद्या खोलीत किंवा छोटय़ा जागेतही ठेवता येऊ शकते. या एका यंत्राची किंमत सुमारे एक ते सव्वा लाख रुपये आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता आता अनेकजण यंत्राचाच वापर करतात. एका यंत्रामुळे सुमारे १० कामगार बेकार होत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अगरबत्ती उत्पादक आणि वितरक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ बायकेरी यांनी दिली.