चीनमधील पायाभूत सुविधा आणि विकासाचा वेग अतिशय चांगला असून शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प चिनी कंपन्यांच्या मदतीने पूर्ण केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. चीनने केलेली विकासकामे पाहण्यासाठी आमदारांचे एक शिष्टमंडळही लवकरच चीनला पाठविले जाईल, असे त्यांनी सांगितले.
चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डेजियांग हे मुंबई भेटीवर आले असून त्यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. चीनने ४२ किमीचा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अतिशय कमी वेळेत पूर्ण केला. त्यामुळे मुंबईतही चिनी कंपन्यांची मदत घेऊन विकासकामे केली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कोटणीस कुटुंबियांची भेट
‘इंडियन मेडिकल मिशन टू चायना,१९३८’ च्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त ताजमहाल हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात डेजियांग यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे कुटुंबिय आणि स्मृती समिती सदस्यांची भेट घेतली.डॉ. कोटणीस यांच्या कार्याने भारत व चीनमध्ये निर्माण झालेले ऋणानुबंध यापुढेही जपले जातील, असे डेजियांग यांनी सांगितले. डेजियांग यांनी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन चर्चा केली.