४६ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी ३५ कंपन्यांमध्ये चुरस; दहा जिल्ह्य़ातून मार्ग जाणार

सुमारे ४६ हजार कोटी खर्चाच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम मिळविण्यासाठी भारतीय कंपन्यांबरोबरच चीन, मलेशिया आणि कोरियातील अशा ३५ हून अधिक कंपन्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सहा टप्प्यांत या प्रकल्पाचे काम देण्यात येणार असून, ते मिळविण्यासाठी या कंपन्यांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत.

मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासांच्या प्रवासावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची तीन वर्षांत बांधणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा समृद्धी द्रुतगती महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. मुख्य महामार्गासाठी ८ हजार ५२० हेक्टर जमीन लागणार असून, रस्त्यालगतच्या विविध सुविधांसाठी म्हणजेच फूडमॉल, पंप आणि पार्किंगसाठी १५०० हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच प्रकारे ४५० हेक्टरवर एक याप्रमाणे २४ नवनगरांसाठी १० हजार ८०० हेक्टर, अशी एकूण २० हजार ८२० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे. यापैकी १७ हजार ४९९ हेक्टर शेतजमीन असल्याने ती संपादित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळास मोठी कसरत करावी लागत आहे. या प्रकल्पासाठी, त्यातही स्मार्ट सिटीसाठी, जागा देण्यास ठिकठिकाणी शेतकरी विरोध करीत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया केवळ जागा मोजणीपर्यंत सरकली आहे. मात्र, कोणत्याही परस्थितीत मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यावर ‘एमएसआरडीसी’ ठाम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गात दाखविलेल्या स्वारस्यामुळे देश-विदेशातील अनेक मोठय़ा कंपन्या हा प्रकल्प मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा प्रकल्प सहा टप्प्यांत उभारण्यात येणार असून, त्यासाठी एमएसआरडीसीने इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य देकार मागविले होते. त्यानुसार देश-विदेशातील तब्बल ३५ कंपन्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखविल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास मोठय़ा प्रमाणात कंपन्या उत्सुक असून आतापर्यंत ३५ हून अधिक कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे.

सहा टप्प्यांत प्रकल्प होणार असल्याने काम लवकर पूर्ण होईल तसेच अनेक कंपन्यांना भागही घेता येईल. भूसंपादन अंतिम टप्प्यात आले की निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.

या कंपन्यांना स्वारस्य

या प्रकल्पासाठी झालेल्या निविदापूर्व बैठकीत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, शापुरजी पालनजी, एमईपी, मेघा इंजिनीअरिंग, एचएससी, जीव्हीपीआर, रिलायन्स, एनसीसीलि. जेव्हीआर, हुंदायी, अशोका बिडकॉन, गायत्री, पीएनसी आदी कंपन्यांनी या प्रकल्पात स्वारस्य दाखविले आहे. त्याचप्रमाणे आयझेनॉ ही मलेशिय तसेच साऊथ कोरिया कॉर्पोरेशन, चायना इंजिनीअरिंग आदी विदेशी कंपन्यांनीही या महामार्गाच्या कामात स्वारस्य दाखविले आहे.