News Flash

चिं. त्र्यं. खानोलकरांचे ‘आदिपर्व’ उलगडणार!

जया दडकर यांच्या लेखणीतून नवा चरित्रग्रंथ

जया दडकर यांच्या लेखणीतून नवा चरित्रग्रंथ
कादंबरी, नाटक आणि कवितेतून मराठी सारस्वताचे नक्षत्रांचे देणे फेडू पाहाणारे प्रतिभावंत लेखक चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या प्राथमिक जडणघडणीचा धांडोळा घेणारा नवा चरित्रग्रंथ ज्येष्ठ साहित्यिक आणि छायाचित्रकार जया दडकर यांनी सिद्ध केला असून ‘मौज’तर्फे त्याचे प्रकाशन होणार आहे. ‘चिं. त्र्यं. खानोलकर : आदिपर्व’ असे या ग्रंथाचे नाव आहे.
याआधी दडकर यांच्या ‘चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात’ या ग्रंथाने अक्षरातच हरवलेल्या या साहित्यिकाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा पहिला प्रयत्न केला होता. ‘आदिपर्व’ हे त्यांचे या शोधातले पुढचे पाऊल आहे. खानोलकरांचे बालपण कोकणातल्या कुडाळ गावी गेले, पुढे ते मुंबईत आले. कुडाळ येथील सामाजिक, साहित्यिक वातावरण, तत्कालिन कोकणी समाजाचे जगणे, कुटुंब, नातेसंबंध आणि घरातली यथातथा परिस्थिती हे सगळे एकीकडे तर दुसरीकडे कवितेमुळे आलेले झपाटलेपण आणि प्रतिभेचे स्फुरण असा खानोलकर यांच्या जगण्याचा भरजरी ऐवज या पुस्तकात असणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून साहित्यिक आणि अभ्यासकांना आरती प्रभूंच्या प्रतिमेचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. आरती प्रभूंच्या अनेक आठवणी, अनेक संभाषणे, अनेक रूपे आणि अनेक दिवसांच्या भेटीगाठीतील संदर्भ तपासून हा ग्रंथ पूर्ण करण्यात आला आहे.
चिं. त्र्यं. खानोलकर यांची कवी म्हणून ओळख असणारे कुडाळकर मूठभरच होते. त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढे स्नेहीसोबती. यांच्यापैकी एखाद दुसरा त्यांची कविता आवर्जून वाचून त्यांना दाद देणारा असे. इतरांना केवळ त्यांचे कौतुक होते. तर व्यवसायाचे भान विसरून कुठेही केव्हाही रंगून जाणारा चिंतू, अशीच त्यांची सर्वसाधारण ओळख झाली होती. मात्र १९५३ साली खानोलकरांची ‘कुढत कां राहायचं?’ ही कविता प्रसिद्ध झाली आणि कवी म्हणून त्यांचे नाव दक्षिण कोकणवासीयांच्या नजरसमोर आले. ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘एक शून्य बाजीराव’ यासारख्या नाटकांनी आणि ‘कोंडुरा’, ‘गणूराय आणि चानी’ यासारख्या कादंबऱ्यांनीही वाचकांचे भाव आणि विचारविश्व समृद्ध करणारे खानोलकर कवितांतूनही अस्पर्श क्षितिजांकडे रसिकांना खुणावत होते .

माझ्या मनात खानोलरांच्या व्यक्तिमत्वाविषयी नेहमीच कुतूहल राहिले आहे. कुडाळला असताना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्पे त्यांनी माझ्यासमोर उलगडले होते. त्यावेळी मी त्यांचे चरित्र पूर्ण करण्यासाठी माहिती गोळा करत होतो. मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि मी एकाकी पडलो. परंतु त्यांची साहित्यिक जडणघडण जाणून घेण्याची ऊर्मी कायम होती. २०१० साली पुन्हा धडपड सुरू केली. आता सुमारे ४० ते ५० वर्षांनंतर हे चरित्र पूर्ण होत आहे, याचा आनंदच आहे.
-जया दडकर, लेखक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 2:26 am

Web Title: chintamani tryambak khanolkar
Next Stories
1 वातानुकूलित गाडीचे दोन डबे गायब!
2 डाळींच्या भाववाढीला सरकारचा हातभार
3 १५ हजार अनधिकृत धार्मिक स्थळे ‘जैसे थे’च
Just Now!
X