शैलजा तिवले

टाळेबंदीमुळे खासगी दवाखाने बंद असल्याने  तीव्र मानसिक आजारांच्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा पर्याय उपलब्ध असला तरी तिथे पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध होण्यास अडथळे येत असल्याने यांना न्यावे कसे असा प्रश्न कुटुंबीयांपुढे निर्माण झाला आहे. सर्वसाधारपणे बाह्य़रुग्ण विभागात दर दिवशी किमान २५० ते ३०० रुग्ण हजेरी लावतात. परंतु टाळेबंदीमुळे सध्या ४० रुग्णच येत असल्याचे नायर रुग्णालयातील मानसोपचार विभागातील डॉ. अलका सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

सध्या बाह्य़रुग्ण विभागात २० टक्के रुग्ण पोहोचू शकत आहेत. ८० टक्के रुग्णांना ऑनलाइन सेवा आम्ही देत आहोत. परंतु तीव्र मनोविकार असलेल्या रुग्णांना ऑनलाइन उपचार देणे अशक्य आहे. त्यात जवळील खासगी रुग्णालये बंद असल्याने या रुग्णांना सरकारी रुग्णालयांमधील आपत्कालीन विभागांमध्ये पाठवावे लागते. हे रुग्ण प्रसंगी हिंसक वर्तन करतात. त्यामुळे त्यांना दूरवरील रुग्णालयांपर्यंत नेणेही अवघड असते. स्क्रिझोफ्रेनिया या विचारांचा आजार असलेल्या व्यक्तींमधील तीव्र आजार असलेले पाच ते दहा टक्के रुग्ण मोजले तरी अशा अनेक मानसिक आजारांमधील तीव्र मनोविकार रुग्णांची संख्या ही नोंद घेण्याइतपत आहे, असे इन्स्टिय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थचे (आयपीएच) मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सांगतात.

टाळेबंदीच्या काळात जे मानसिक आजाराच्या सीमारेषेवर होते अशा व्यक्तींमधील करोनाच्या निमित्ताने मंत्रचळ, चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढली आहे. यामुळे नातेसंबंधांमधील तणाव वाढले आहेत.

बाह्य़रुग्ण विभागात दरदिवशी यासंबंधी तीन ते चार रुग्ण येत आहेत. एका कुटुंबामध्ये आधीच वाद होते. त्यात आता कुटुंब बराच काळ एकत्र राहिल्याने वाद वाढून मारहाणीच्या घटनाही वारंवार होत असल्याची तक्रार घेऊन एक महिला आली होती. त्यामुळे  महिला, लहान मुले यांवरील हिंसाचारातही वाढ होत. यावर मात करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे डॉ. नाडकर्णी म्हणाले.

औषधे पोहोचविण्यासाठी उपाययोजना

ई चिठ्ठीला परवानगी मिळाल्याने आम्ही पनवेल, बदलापूर अशा दूरवरून येणाऱ्या रुग्णांच्या जवळील औषधांच्या दुकानांशी संपर्क साधून औषधे देण्यास सांगितले आहे. रुग्णांनी औषधे वेळेत न नेल्यास त्यांच्या घरी जाऊन देण्याचीही विनंती या दुकानदारांना केली आहे. तसेच फोनच्या माध्यमातून रुग्णांच्या संपर्कात आहोत, असे काही उपाय करून नक्कीच रुग्णांना वेळेवर औषधे पोहोचविणे शक्य आहे.

बरे झालेले रुग्ण परतीच्या प्रतीक्षेत

रुग्णालयात बाहेरील जिल्ह्य़ांमधून रुग्ण दाखल होतात. यातील काही मनोरुग्ण सध्या बरे झाले असून त्यांना घरी परतायचे आहे. परंतु परतण्यासाठी वाहन सुविधा नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या आवारातच राहावे लागत आहे. यांना वेळेवर कु टुंबाचा आधार न मिळाल्यास मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता अधिक असल्याचे डॉ. शहा व्यक्त करतात.

करोनाफोबियाच्या रुग्णांमध्ये वाढ

मेंदूतील सिरोटोनीन द्रव्य कमी झाल्यानंतर रुग्णांना भीती वाटण्याचे प्रमाण वाढते. याआधी एचआयव्ही झाल्याच्या भीतीने काही रुग्ण आमच्याकडे यायचे, आता करोना झाला असून आपण आता मरणार या भीतीने येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला आम्ही करोनाफोबिया म्हणतो, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश शहा सांगतात.

व्हिडीओच्या माध्यमातून रुग्णांचे समुपदेशन करण्याचा मार्ग सध्या अवलंबिला जात असला तरी यातही नेटवर्क नीट उपलब्ध नसणे, घरात गोपनीयता वाटत नसल्याने मोकळेपणाने रुग्णांना व्यक्त होता न येणे अशी आव्हाने असल्याचे नाशिकच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. गुंजन कुलकर्णी सांगतात.